इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सात जणांच्या यादीवर सोमवारी शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आज त्यांचा शपथविधी संपन्न झाला. विधानभवनच्या सेंट्रल हॅालमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी या सदस्यांना शपथ दिली. या आमदारांची यादी सोमवारी राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. सोमवारी रात्री उशीरा राज्यपालांनी या नावाला मंजुरी दिली, त्यानंतर आज हा शपथविधी पार पडला. दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करणार आहे. त्याअगोदर दुपारी १२ वाजताच हा शपथविधी सोहळा पार पडला.
शपथ घेणा-यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार पंकज भुजबळ व राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विभागाचे इद्रिस नाईकवाडी, भाजपच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, शिवसेना शिंदे गटाने मनिषा कायंदे, हेमंत पाटील तर यांचा समावेश आहे. विधान परिषदेसाठी १२ जणांची नावे पाठवायची असतांना सात जणांची यादी पाठवण्यात आली. त्यात ३-२-२ असा फॅार्म्युला वापरण्यात आला.
नांदगावमध्ये संघर्ष टळणार
अजित पवार गटाने पंकज भुजबळ यांना संधी दिली आहे. पंकज भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदार संघातून दोन वेळेस आमदार झाले. पण, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेचे सुहास कांदे यांनी १४ हजार मतांनी या मतदार संघातून विजयी झाले. महायुतीत कांदे हे शिंदे गटाकडून उमेदवार आहे. त्यामुळे पंकज भुजबळ यांची अडचण होणार असल्यामुळे अजित पवार गटाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.