मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२० मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या एकूण ६५० पदांपैकी आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या ६५ पदांचा निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राखीव ठेवून उर्वरित ५८३ पदांचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
परीक्षेच्या जाहिरातीत अनाथ प्रवर्गासाठी ०६ पदे राखीव होती. तथापि, अंतिम निकालात केवळ ०४ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले असल्यामुळे अनाथ प्रवर्गाची ०२ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. या परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालानुसार वाशिम जिल्ह्यातील श्री. खचकड सुनिल भगवान, हे राज्यातून तसेच मागासवर्गातून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्हयातील श्रीमती बिडगर सुरेखा रमेश, ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.
आयोगाच्या संकेतस्थळावर कट ऑफ मार्क्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या ५८३ उमेदवारांचा गुणवत्ताक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव ६५ पदांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम करण्यात येईल. अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.