नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (DoT) मार्फत स्थानिक प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी टूर गाईडची व्यवस्था करून या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने नाशिक येथे पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. पर्यटन संचालनालयामार्फत 23 ते 27 फेब्रुवारी 2022 या 5 दिवसीय कालावधीत 54 प्रशिक्षणार्थीना विनामुल्य प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमातून नाशिक विभागात परवानाधारक 50 गाईड तयार झाले आहेत, अशी माहिती पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई – राठोड यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राबविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट (IITTM) ग्वालियर येथील प्रशिक्षक चंद्रशेखर बरूआ यांनी उत्तम प्रशिक्षण दिले. पर्यटन संचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन केले होते. पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षणार्थीना पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करणेसाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले. फिल्ड ट्रीपचे आयोजन करुन नाशिक येथील पांडवलेणी, रामशेज किल्ला, केटीएचएम महाविद्यालय येथील संग्रहालय या पर्यटन स्थळांना भेटी देण्यात आल्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थीची परिक्षा देखील घेण्यात आली आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप 27 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात असून या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व नाशिकमध्ये पर्यटक मार्गदर्शक (पर्यटन गाईड) म्हणून काम करणेसाठी ओळखपत्र देण्यात आले आहे. सदर ओळखपत्राची मुदत मार्च 2027 पर्यंत असून त्यानंतर पुन्हा एकदिवसीय रि फ्रेशर कोर्स घेवून मुदतवाढ देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षणार्थी यापुढे पर्यटन संचालनालयाचे अधिकृत गाईड म्हणून पर्यटकांना सेवा देतील. त्यांचे नावांची यादी पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही उपसंचालक मधुमती सरदेसाई – राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. समारोप कार्यक्रमास गोखले एज्यूकेशन संस्थेच्या HPT आर्टस व आरवायके सायन्स महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. एन, सूर्यवंशी, उपसंचालक मधुमती सरदेसाई – राठोड, मुंबई येथील अधिकारी योगेश निरगुडे, प्रशिक्षक श्री. बरूआ, HPT महाविदयालयाचे प्राध्यापक श्री. पठारे सर, उपसंचालक कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.