विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात आज किती ऑक्सिजन उपलब्ध झाला आणि त्याचे वितरण यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. डॉ. टोपे म्हणाले की, राज्यात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढलेली आहे.या रूग्णांवर उपचारासाठी मेडीकल ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे.त्यामुळे राज्यात उत्पादित होणारे आणि इतर राज्यातून प्राप्त होणारे ऑक्सिजन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सुरळीतपणे व त्या-त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यातील लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठा बाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात येते.
डॉ. टोपे यांनी सांगितले की, आज ६ मे रोजी प्रशासनाने उत्पादकांना १७१३ टन ऑक्सीजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे. ४ मे रोजी राज्यात १७२० टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या २५७.५ टन ऑक्सिजनचा अंतर्भाव आहे. गुजरात येथून ११६.५ टन, भिलाई छत्तीसगड येथून ६० टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून ८१ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे. ५ मे साठी उत्पादक १६६१ टन ऑक्सिजन वितरीत करणार आहेत, असे उत्पादकांकडून प्राप्त प्रस्तावित वितरण पत्रावरून दिसून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाव्दारे व शासनाव्दारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स व्दारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत, असेही डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले.