मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात तब्बल १४ हजार झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात ‘गेल’ने गॅस पाइपलाइन टाकण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात राज्यात वृक्षतोड होणार आहे. झाडे कापली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘गेल’च्या या प्रकल्पासंदर्भात राज्य वन्यजीव मंडळाची बैठक २ मे रोजी झाली. त्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्या बैठकीत वृक्षतोडीबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता. दरम्यान केंद्र सरकारला मात्र गेलच्या मंजुरीसाठी तात्काळ मंजुरी हवी होती. परिणामत: महिनाभराच्या आता दुसरी बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये राज्य वन्यजीव मंडळाने १४ हजार २४१ झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एकूण चार प्रकल्पांसाठी ही झाडे तोडण्यात येणार आहेत.
‘गेल’ची गॅस पाइपलाइन बोर आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांच्या कॉरिडॉरमधून जाते. नागपूर ते मध्य प्रदेशातील जबलपूरपर्यंत द्रवरुप नैसर्गिक वायू पाइपलाइनच्या माध्यमातून वाहून नेला जाणार आहे. ३२० किलोमीटरच्या अंतराच्या लाईनपैकी २४ किलोमीटर वनक्षेत्र आहे. येथील झाडे तोडण्यात येणार आहेत. वन्यजीव मंडळाने २२० केव्हीची ठाणे सॅटेलाइट लाइन मंजूर केली आहे. जी ठाण्याच्या खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या आत ६२ किलोमीटरमधून जाते. यासाठी ४३९ झाडे तोडण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात ५१४० झाडांची कत्तल
ज्यातील बामणी गावापासून ते तेलंगणापर्यंत राष्ट्रीय महामार्ग ९३० डी च्या रुंदीकरणासाठी ६ हजार ८०५ झाडे तोडली जाणार आहेत. ताडोबा-अंधारी-कन्हारगाव-इंद्रावत-कवळ या टायगर कॉरिडॉरमधून हा मार्ग जातो. तसेच ताडोबा-अंधारी-कवळ भागातील व्याघ्र कॉरिडॉरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ बी च्या रुंदीकरणासाठी ५,१४० झाडे तोडली जाणार आहेत. या गंभीर प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
Maharashtra Thousands Tree Cutting Permission CM