पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील १२ हजार ६५३ शिक्षकांचे आधार कार्ड अवैध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकीकडे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अपडेशनच्या कामात व्यस्त असलेल्या सरकारी यंत्रणेपुढे आता शिक्षकांच्या आधार कार्डच्या निमित्ताने नवे टेंशन उभे झाले आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने ३० एप्रिलपर्यंत सर्व शिक्षकांचे आधार कार्ड यू-डायस प्रणालीमध्ये वैध करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे विविध सरकारी अभियानांमध्ये सक्रीय राहणाऱ्या शिक्षकांकडून आधार कार्ड अपडेशनचेच काम कसे काय राहून गेले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अपडेशनचे काम मोठ्या प्रमाणात बाकी आहे. या कामाची जबाबदारी शिक्षकांवरच आहे. ते स्वतःच विद्यार्थ्यांच्या आधार कार्डच्या कामात व्यस्त आहेत. अश्यात स्वतःच्या आधार कार्डचा नवा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे.
गंमत म्हणजे जे शिक्षक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याच्या कामात व्यस्त आहेत, त्यांचेच आधार कार्ड अवैध असल्याची बाब पुढे आली आहे. या आधार कार्डच्या अपडेशनवरच २०२२-२३ ची संच मान्यता ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येवरूनच राज्यातील शिक्षकांची संख्या निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आधार कार्ड व्हॅलिडेट करणे आणि माहिती भरणे सक्तीचे आहे. नाहीतर राज्यातील शिक्षकांच्या यादीमध्ये अश्या शिक्षकांना अवैध ठरविले जाईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
मुंबई, पुणे आघाडीवर
आधार कार्ड अवैध असलेल्या १२ हजार ६५३ शिक्षकांमध्ये सर्वाधिक मुंबई आणि पुण्यातील आहेत. मुंबईमध्ये १ हजार ४५५, पुण्यात १ हजार ४०२, ठाण्यात १ हजार ३२२, नागपूरमध्ये ८२७, सोलापूर येथे ६१७, नाशिकमध्ये ५९८, संभाजीनगरमध्ये ५८७ आणि पालघरमध्ये ५६५ शिक्षकांचे आधार कार्ड अवैध असल्याचे आढळले आहे.
विदर्भातील दोन हजार शिक्षक
विदर्भातील १ हजार ८८९ शिक्षकांचे आधार कार्ड अपडेट नसून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील २४७ शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व शिक्षकांना ३० एप्रिलपर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
तर आधार कार्ड बोगस ठरणार
बीड जिल्ह्यातील १६५ शिक्षकांचे आधार कार्ड लिंक होत नसल्याने त्यांना ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे आणि त्यानंतरही आधार कार्ड लिंक न झाल्यास या शिक्षकांचे आधार कार्ड बोगस घोषित करण्यात येतील, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
Maharashtra Thousands of Teachers Aadhar Card Invalid