मुंबई – राज्यातील कोरोना निर्बंधांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य टास्क फोर्सची बैठक थोड्याच वेळात होत आहे. त्यात यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या आठवड्याभरात राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच, ओमिक्रॉन बाधितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.
कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. कोविडच्या वाढत्या संसर्गावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापूर्वीच चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1476440575058403328?s=20
जानेवारीच्या मध्यात कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सद्या 5 लाख डोसेस दिवसाला दिले जातात. यावेळी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल, असे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. 8 डिसेंबर रोजी राज्यात 6200 सक्रिय रुग्ण होते. मात्र ही संख्या आता 10 हजाराहून अधिक झाली आहे. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत ७० टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत पाचपटीने वाढ झाली आहे.