नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ हा चित्ररथ झळकला होता. या चित्ररथास केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय आणि लोकपसंतीत तृतीय पुरस्कार एका दिमाखदार सोहळ्यात आज प्रदान करण्यात आला. आंतरराज्य सांस्कृतिक स्पर्धेत राज्याचा द्वितीय क्रमांक आला होता. असे एकूण तीन श्रेणीतील पुरस्कारांनी यावर्षी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले आहे.
येथील छावणी परिसरातील रंगशाळेत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या चित्ररथास सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा व्दितीय क्रमांकाचा लोकपसंतीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी आणि त्यांच्या चमूने हे पुरस्कार स्वीकारले. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश राज्यांच्या चित्ररथाला अनुक्रमे प्रथम आणि तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला आहे.आजच्या पुरस्कार प्रदान सोहळयात आंतरराज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेत्या राज्यांची नृत्य सादर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राने धनगरी लोककला प्रकारातील नृत्य सादर केले. याच नृत्याला दिव्तीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
74 व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित मुख्य कार्यक्रमातील चित्ररथांसाठी ‘नारी शक्ती’ वर आधारित संकल्पना मांडण्यात आली होती. त्याला अनुसरून राज्याने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ असा चित्ररथ उभारला होता. कर्तव्यपथावरील पथसंचलनात सर्वांचे लक्ष या चित्ररथाने वेधले होते. यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पीठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दर्शविण्यात आली होती.
असा होता राज्याचा चित्ररथ
महाराष्ट्राने ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ चा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविला. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठांचे दर्शन पथसंलनात सर्वांना घेता आले. या चित्ररथात संबळ वाजविणारे गोंधळी, पोतराज, हलगी वाजवून देवीची आराधना करणारा भक्त, असे भक्तिमय वातावरण कर्तव्यपथावर चित्ररथाच्यामाध्यातून दर्शविले होते. यामध्ये लोककलाकार हे देवीचे भक्तीगीत गात नृत्यकरून “साडेतीन शक्तिपीठे दाखविती आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” अशी अर्चना करीत होते. उच्च स्तरीय समितीने निकषाच्या आधारे राज्याच्या चित्ररथाला व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार सोमवारी जाहिर केला.
आतापर्यंत राज्याच्या चित्ररथाला मिळालेले पुरस्कार
वर्ष 1970 ला राज्याने प्रथम चित्ररथ सादर केला होता. राजधानीतील मुख्य पथसंचलनाच्या कार्यक्रमात राज्याच्या वैभवशाली ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास चित्ररथाच्या माध्यमाने दर्शविले आहे.
राज्याला वर्ष 1981, 1983, 1993,1994, 1995, 2015, 2018 असे एकूण 7 वेळा प्रथम पुरस्कार पटकाविलेला आहे. यामध्ये राज्याने 1993 ते 1995 असे सलग तीन वर्ष प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम नोंदविलेला आहे.
वर्ष 1986, 1988,2009 असे तीन वेळा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. वर्ष 2007 व 2017 मध्ये तिसरा क्रमांक राज्याने राखला होता. मागील वर्षी 2022 मध्ये लोकप्रिय चित्ररथाच्या श्रेणीत राज्याने प्रथम क्रमांक मिळविला होता. यावर्षी चित्ररथाला दुसरा आणि लोक पसंती या श्रेणीत तिसरा पुरस्कार मिळालेला आहे. असे एकूण 14 पुरस्कार आतापर्यंत राज्याला प्राप्त झाले आहेत.
यावर्षीच्या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. शुभ ऍड या संस्थेने चित्ररथाचे काम प्रत्यक्षात उतरविले होते. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहीले. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समुह, ठाणे येथील होते.
Maharashtra Tableau 3 Awards Republic Day