मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मा फुले आर्थिक विकास मागासवर्ग महामंडळाच्या माध्यमातून सफाई कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी तसेच योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष श्री. एम वेंकटेशन यांनी दिले आहेत. राज्यातील सफाई कामगार यांचे विविध प्रश्न,व अडचणींबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष, श्री. एम. वेंकटेशन, व सदस्य श्री. पी.पी.वावा यांनी आज रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह याबाबत आढावा घेतला असता त्यांनी यावेळी निर्देश दिले आहेत.
राज्य शासनाच्या विविध विभागाच्या वतीने सफाई कामगार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजना, अनुकंपावरील वारसांना नोकरी देणे, महात्मा फुले विकास महामंडळाच्या महाप्रित कंपनीच्या योजना , ‘नमस्ते’ मोहिम,त्याचबरोबर हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व पुनर्वसन करणे या अधिनियमानुसार कामगारांना आधुनिक यंत्रसामग्री, साधनसामग्री पुरवणे याबाबत आयोगाने सविस्तर आढावा घेतला. राज्यात सामाजिक न्याय विभागाने सफाई कामगारांसाठी प्लास्टिक क्रेडिट चा लाभ मिळण्यासाठी हिंदुस्तान ऍग्रो या कंपनीच्या वतीने अभिनव संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे.
तज्ञांच्या सल्ल्याने प्लास्टिक क्रेडिटचे फायदे हे सफाई कर्मचारी यांच्यापर्यंत कसे पारदर्शक पद्धतीने पोचवू शकतो यावर चर्चा झाली. प्लास्टिक क्रेडिट, कार्बन क्रेडिट, आणि इतर प्रकारचे क्रेडिट या अश्या संकल्पना आहेत, ज्यामुळे प्लास्टिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच पर्यावरणाला ही फायदा होणार आहे, व विशेष म्हणजे सफाई कामगारांनी जमा केलेल्या या प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यातून आर्थिक उत्पन देखील मिळणार आहे. या योजनेचेही सादरीकरण हिंदुस्तान ऍग्रो चे डॉ. भरत ढोकणे पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी बृहन्मुंबई मनपा चे आयुक्त श्री. आय एस चहल, बेस्ट चे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी मुंबईत सफाई कामगारांकरिता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयोगास दिली.
राज्यात आज अखेर हाताने मैला साफ करणाऱ्या व दुर्दैवाने मृत्यू झालेल्या ७३ कामगारांना प्रत्येकी १० लाख रुपयाची नुकसान भरपाई वारसांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्याचे माहिती यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगून राज्यात हाताने मैला उचलण्याच्या प्रथेस प्रतिबंध करण्यात आल्याचे सांगितले.महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ यांचेकडुन यावेळी विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले.
सदर बैठकीस राज्य शासनाच्या नगर विकास विभाग , गृहनिर्माण विभाग, आरोग्य विभाग, यांचे प्रतिनिधी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, सह सचिव, सामाजिक न्याय विभाग श्री. दिनेश डिंगळे, श्री. सो.ना.बागुल,सह सचिव, सामाजिक न्याय विभाग, महाव्यवस्थापक, हिंदुस्तान ऍग्रो चे कन्सल्टंट गौरव सोमवंशी, अनिल चोप्रा, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रवींद्र गोरवे, समाज कल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे ,सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार,लंडनच्या ‘सिर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब’चे संचालक जोएल मायकल, ब्लॉकचेन तज्ञ आणि इमरटेक इनोव्हेशन्स या आय. आय.टी बॉंबेशी निगडित स्टार्टअपचे सह-संस्थापक गौरव सोमवंशी, आंतरराष्ट्रीय पातळीवर यावर काम करणारे जोएल मायकल, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित चे अधिकारी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी तसेच राज्यातील सफाई कामगारांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, श्री गोविंद परमार, श्री वाघमारे यांच्या सह सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.