मुंबई – कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले असले तरी बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. तसेच, रस्त्यावर आणि विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक दिसून येत असल्याने राज्यात कडक लॉकडाऊन लागू होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भातील निर्णय येत्या २ ते ३ दिवसात जाहिर होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. हा कडक लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंतच असेल की त्यानंतरही असेल याबाबत ते म्हणाले की, सध्या राज्यात कलम १४४ हे ३० एप्रिलपर्यंत लागू आहे. कडक लॉकडाऊन लावल्यानंतर काय स्थिती आहे, त्याचा आढावा घेतला जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही तर ३० एप्रिल नंतरही कडक लॉकडाऊन राहण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईत कडक लॉकडाऊनची गरज व्यक्त केली आहे. नाशिक हे कोरोना बाधितांच्या संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तेथील आरोग्य सुविधा कोलमडल्या असून नाशकात कडक लॉकडाऊन करण्याची विनंती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, राज्यातील अन्य शहरांमधूनही तशाच प्रकारची विनंती मुख्यमंत्र्यांकडे येत आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, राजधानी दिल्लीत सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. अन्य राज्यही लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.