मुंबई – शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद यांचा कारभार हा सावळागोंधळच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. परिषदेच्यावतीने इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत हाच प्रत्यय येत आहे. दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात होणारी शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे होऊ शकली नाही. त्यानंतर ही परीक्षा २२-२३ मे रोजी घेण्याचे जाहीर झाले. मात्र, त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट उच्च पातळीवर असल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा कधीही पावसाळ्यात घेतली जात नाही. असे असताना ही परीक्षा ८ ऑगस्ट रोजी ऐन पावसाळ्यात घेण्यात आली. विशेष म्हणजे, या परीक्षेची घोषणा २२ जुलै रोजी करण्यात आली. अवघ्या १५ दिवस आधी ही घोषणा झाल्याने विद्यार्थी व पालक प्रचंड गोंधळले. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुराचे थैमान सुरू असल्याने अखेर ही परीक्षा ९ ऑगस्ट रोजी घेण्याचे परिषदेने जाहीर केले. आता ९ ऑगस्टलाही राज्यस्तरीय एका परीक्षा असल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी घेण्याचे आदेश परिषदेने काढले आहेत. या सर्व प्रकारात शिक्षण विभाग आणि परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असून याप्रकरणी सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
परिषदेचे आदेश असे