मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. इयत्ता बारावीची वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. राज्यातील १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यी ही परीक्षा देत आहेत. या परीक्षेसाठी बोर्डाने ९ हजार ६३५ केंद्र दिले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. तसेच, कोरोना काळात विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याने परीक्षेसाठी अर्धा तास वाढवून दिला आहे. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरच्या प्रश्नपत्रिकेत एक चूक झाल्याचे समोर आले आहे. ही बाब बोर्डाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देण्यात आली आहे. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत 1) A) 5 हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी तो सोडविण्याचा प्रयत्न केला. अखेर याची दखल घेत आता विद्यार्थ्यांना या प्रश्नाचा १ गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.