मुंबई – वाढत्या महागाईने सर्वसामान्यांवर दररोज काही ना काही भर पडत आहे. आता एसटी महामंडळानेही दरवाढ जाहीर केली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ मोठी परिणाम करणारी आहे. विशेष म्हणजे, मंगळवारपासून (२६ ऑक्टोबर) एसटीच्या सर्व प्रवास तिकीटांवर १७ टक्क्यांची वाढ लागू होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
पेट्रोल-डिझेलसारखे इंधन, भाजीपाला, किराणा अशा सर्वच वस्तूंचे दर दिवसागणिक वाढत आहेत. त्यात आता एसटी महामंडळानेही दरवाढीची दणका दिला आहे. यापूर्वी जून २०१८ मध्ये एसटीने भाडेवाढ लागू केली होती. त्यानंतर आता इंधर दरवाढीमुळे निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळासमोर दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यास मंजुरी देऊन ती लागू करण्याचे निश्चित झाले आहे. एसटी महामंडळाला तोटा सहन करणे शक्य नाही. तब्बल १२ हजार ५०० कोटी रुपयांचा तोटा महामंडळाला सहन करावा लागत आहे. दरवाढीमुळे महामंडळाचा तोटा कमी होणे आणि कर्मचाऱ्यांना वेळेत पगार करणे शक्य होईल, असे महामंडळाने म्हटले आहे.