मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या येथे सुरू आहे. त्यातच आज तातडीने राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राज्यातील पाऊस, पेरणी आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्य सचिव मनोज कुमार सौनिक, सर्व विभागांचे मंत्री, प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील पावसाच्या सद्यस्थितीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.
राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ टक्के आणि कापसाची ९६ टक्के झाली आहे. जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.