मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात सलग दुसऱ्यांदा भूकंप झाला. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली. त्यानंतर आता अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. या सर्व राजकीय नाट्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या बंडखोरांनीही हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह ८ नव्या मंत्र्यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक, सर्व विभागांचे प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. त्यातील काही प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीतील झालेले निर्णय असे (संक्षिप्त)
१. राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन
२. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती
३. दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता
४. नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार
५. सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
६. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
७. नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र
८. मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे
(सविस्तर वृत्त लवकरच)