मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झालेल्या १० प्रस्तावित विधेयकांसह १४ विधेयकांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच ६ अध्यादेश पटलावर ठेवण्यात येतील. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर हे पहिले अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधी बाकावरील आमदारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे विरोधक कमी संख्येत कसा विरोध करतात. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधकांनी काल सायंकाळी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या अधिवेशनात सत्ताधारी सरकारचे बहुमत हे २०० पेक्षा अधिक आमदारांचे आहे. तर, विरोधकांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे या अधिवेशनात नेमके काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात आज विधानसभेत वंदेमातरम् आणि राज्यगीताने झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विधानसभा सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आठ नवीन मंत्र्यांचा परिचय आज विधानसभेत करुन दिला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे – पाटील, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचा परिचय विधानसभेत करुन दिला.
महाराष्ट्र विधानसभेचे आजच्या दिवसाचे काम सुरू झाले आहे. बघा, त्याचे हे थेट प्रक्षेपण