मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१७ जुलै) सुरू होत आहे. हे अधिवेशन ४ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या या अधिवेशनासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
विधिमंडळाच्या शतकोतर प्रवासाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ वाटचालीचे दस्ताऐवजीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सूचित केले. विधिमंडळाचा गौरवशाली इतिहास संदर्भग्रंथाच्या माध्यमातून जतन करण्याचे तसेच विविध परिसंवादाद्वारे विधिमंडळाच्या आजपर्यंतच्या कामकाजातून महत्त्वपूर्ण घटना, प्रसंगांना उजाळा देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्याची सूचना यापूर्वीच मांडण्यात आली आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. १७ जुलै ते ४ ऑगस्ट या १९ दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस १५ आहेत. त्यात ४ दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे (शनिवार, रविवार) असणार आहेत.
राजकीय हालचाली
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील आमदारांचा मोठा गट सहभागी झाला आहे. त्यामुळेच सत्ताधारी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपही नुकताच झाला आहे. सत्ताधाऱ्यांची संख्या आता मोठी झाली आहे. तर, विरोधकांची संख्या अल्प झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनात विरोधक सरकारला धारेवर धरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विरोधी पक्ष नेता कोण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे गेल्या अधिवेशनापर्यंत विरोधी पक्षनेते होते. मात्र, आता पवार हेच सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्ष नेता कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस पक्षाने या पदावर दावा केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर हे यासंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहेत.