पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यामुळे आता दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. विद्यार्थ्यांना फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. साधारणतः ७ जून पर्यंत निकाल जाहीर होतील, असे सांगण्यात येते. दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते करिअरसाठी टर्निंग पॉईंट म्हणून या निकालाकडे पाहिले जाते. साहजिकच दहावीचा निकाल कधी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता असते. सध्या विद्यार्थ्यांबरोबर पालक देखील दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे.
अधिकृत घोषणा नाही
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे ७ जून पर्यंत महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून येत आहे. मात्र महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेसंदर्भात बोर्डाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार इयत्ता बारावीचे निकाल लागल्यानंतर आठवड्याभराच्या कालावधीत दहावीचेही निकाल लागतील असे सांगण्यात आले होते.
निकालांसंबंधी सर्व तयारी पूर्ण
निकालानंतर पुनर्तपासणीसाठीचे अर्ज आणि त्याबाबतची माहिती अद्याप शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली नाही. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. थोडक्यात काय तर, बोर्डाकडून परीक्षांच्या निकालांसंबंधी सर्व तयारी पूर्ण झाली असून लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षकांनी पुकारलेल्या संपामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र संप मागे घेतल्यानंतर आता बारावी बोर्ड परीक्षा निकाल वेळेत जाहीर झाला. त्यामुळे दहावीचा निकाल देखील वेळेतच जाहीर होण्याची शक्यता आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
मार्च मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत झाली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. दहावी निकालासंदर्भात विविध तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
Maharashtra SSC Board Exam Result Date