मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज तब्बल १७ सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांचे एकूण मूल्य सुमारे ३३,७६८.८९ कोटी रुपये असून, त्यातून राज्यात सुमारे ३३,४८३ रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण व त्यासंबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी शासन वचनबद्ध आहे. सामंजस्य स्वाक्षरी करून न थांबता गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील. याबाबत कुठेही अडथळा येणार नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मैत्री पोर्टल (Maitri Portal) या वन-स्टॉप संकल्पनेचा विशेष उल्लेख केला. उद्योगांसाठी जमीन, परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीने मिळवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे.
ऊर्जाविषयक निर्णयांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात नुकताच ५ वर्षांचा मल्टी-इयर टॅरिफ मंजूर झाला आहे. वीजदर वर्षागणिक कमी होणार आहेत. पूर्वी दरवर्षी वीजदर ९ टक्क्यांनी वाढत असत, पण आता विजेचे दर कमी होणार आहेत. हे उद्योगांसाठी मोठे दिलासादायक ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा जीवनचक्र (Investment Life Cycle) राज्य सरकारने स्थिर आणि अंदाजपत्रित ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत होईल.
या करारान्वये (1) मे.ग्रॅफाईट इंडिया लि. (सिंथेटिक ग्रॅफाईट अनोड मटेरिअल) यांनी रू.4761 कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून याद्वारे 1166 रोजगार निर्मिती होणार आहे. (2) मे.नेक्ट जनरेशन मॅन्युफॅक्चुरिंग प्रा.लि. (इलेक्ट्रॉनिक्स)(रू.1000 कोटी गुंतवणूक आणि 1000 रोजगार निर्मिती), (3) मे.युरोबस भारत प्रा.लि., (इलेक्ट्रीक बस आणि पायाभूत सुविधा प्रकल्प)(रू.4200 कोटी गुंतवणूक आणि 12000 रोजगार निर्मिती), (4) मे.व्हिर्च्यसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. (इलेक्ट्रॉनिक्स)(रू.800 कोटी गुंतवणूक आणि 500 रोजगार निर्मिती), (5) मे.युनो मिंडा ॲटो इनोव्हेशन प्रा.लि. (इलेक्ट्रॉनिक्स)(रू.1650 कोटी गुंतवणूक आणि 1450 रोजगार निर्मिती), (6) मे.इनर्जी इन मोशन प्रा.लि. (इलेक्ट्रीकल ट्रक)(रू.1065 कोटी गुंतवणूक आणि 450 रोजगार निर्मिती), (7) मे.जनरल पॉलिफिल्म प्रा.लि., (फिल्स)(रू.1100 कोटी आणि 200 रोजगार निर्मिती), (8) मे.पीएस स्टील ॲण्ड पॉवर प्रा.लि.(स्टिल) (रू.1000 कोटी गुंतवणूक आणि 430 रोजगार निर्मिती), (9) मे.बीएसएल सोलर लि.(सोलर)(रू.4529.89 कोटी आणि 3582 रोजगार निर्मिती, (10) मे.सुफ्लॅम मेटल्स प्रा.लि. (स्टिल)(रू.1000 कोटी गुंतवणूक आणि 1430 रोजगार निर्मिती), (11) मे.सुफ्लॅम इंडस्ट्रीज प्रा.लि. (स्टिल)(रू.1100 कोटी गुंतवणूक आणि 1430 रोजगार निर्मिती), (12) मे.किर्तीसागर मेटॅलॉईड प्रा.लि. (स्टिल)(रू.1412 कोटी गुंतवणूक आणि 845 रोजगार निर्मिती), (13) मे.गोदरेज ॲण्ड बायस मॅन्युफॅक्चरिंग कं.लि. (संरक्षण क्षेत्र) (रू.1500 कोटी गुंतवणूक आणि 500 रोजगार निर्मिती), (14) मे.सेरम ग्रुप ऑफ कंपनीज (सेरम इन्स्टिट्यूट आणि रायझिंग सन सह)(जैव तंत्रज्ञान)(रू.5000 कोटी आणि 3000 रोजगार निर्मिती), (15) अंबुजा सिमेंट लि.(सिमेंट) (रू.1000 कोटी गुंतवणूक आणि 3000 रोजगार निर्मिती), (16) पॅरासन मशिनरी इंड प्रा.लि. (संरक्षण क्षेत्र)(रू.1000 कोटी गुंतवणूक आणि 3000 रोजगार निर्मिती) आणि (17) मे.आर्सेलर मित्तल जीसीसी प्रा.लि. यांनी जीसीसी क्षेत्रात रू.51 कोटी रूपयांची गुंतवणूक करार केला असून याद्वारे 1000 रोजगार निर्मिती होणार आहे.
या सामंजस्य करारांवेळी मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग सचिव डॉ.पी. अन्बळगन, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.