विशेष प्रतिनिधी, मुंबई
जगभरातील वैज्ञानिक व संशोधकांनी कोरोना हे चीनचेच अपत्य असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर वुहान येथील प्रयोगशाळेतच कोरोनाचा जन्म झाल्याचे पुरावेही वैज्ञानिकांनी पुढे ठेवले. हा दावा करणाऱ्यांमध्ये आता महाराष्ट्रातील एका वैज्ञानिक दाम्पत्याचाही समावेश झाला आहे. त्यांनीही काही तथ्यांच्या आधारावर वुहानच्या सीफूड मार्केटमधून नव्हे तर प्रयोगशाळेतूनच कोरोना जगभरात गेला, असा दावा केला आहे.
डॉ. राहुल आणि डॉ. मोनाली बाहुलीकर यांनी यासंदर्भातील संशोधन मांडले आहे. एप्रिल २०२० मध्ये त्यांनी संशोधन सुरू केले. सार्स-सीओव्ही-१च्या संदर्भातील आरएटीजी१३ ला दक्षीण चीनच्या युन्नान प्रांतातील मोजियांगच्या गुफांमध्ये एकत्र करण्यात आले. आरएटीजी१३ हा देखील एक कोरोना विषाणू आहे. हा विषाणू वुहान इन्स्टीट्यूट आफ व्हायरोलॉजीमध्ये आणला गेला. या गुफांमध्ये मोठ्या प्रमाणात वटवागुळांची संख्या होती. हे सारे वटवागूळ काढून फेकण्यासाठी सहा कामगार लावण्यात आले आणि त्यांना नंतर न्युमोनिया झाला.
जिनोम बदलला
वुहान इन्स्टिट्यूट आफ व्हायरोलॉजी आणि वुहानमधील इतर प्रयोगशाळांमध्ये व्हायरसवर प्रयोग सुरू होते. त्यांनी व्हायरसच्या जिनोममध्ये काही बदल केले आणि त्यातूनच कोरोनाचा जन्म झाल्याची शंका आहे.
पुरावा नाही
वटवागुळात संक्रमण झाले आणि नंतर सीफूड मार्केटच्या माध्यमातून विषाणू पसरला, अशीही एक चर्चा आहे. पण त्याचा पुरावा काहीच नाही, असे दाम्पत्याचे म्हणणे आहे. याउलट हा विषाणू माणसामध्ये संक्रमित होत होता आणि एका प्रयोगशाळेत तयार झाला, याचे पुरावे जास्त आहेत. वैज्ञानिक दामपत्याने जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप केले आहेत. डब्ल्यूएचओने योग्य तपासच केला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.