पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील तब्बल २३८४ शिक्षकांना पदोन्नती मिळणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात तयारी केली आहे. हे सर्व शिक्षक केंद्रप्रमुख होणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे.
त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे दि. १५ जून २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हानिहाय संख्या अशी
नाशिक १२२, नंदुरबार ३३, धुळे ४०, जळगाव ८०,
अमरावती ६९, बुलढाणा ६५, अकोला ४२, वाशिम ३५, यवतमाळ ९०,
नागपूर ६८, वर्धा ४३, भंडारा ३०, गोदिया ४२, गडचिरोली ५०, चंद्रपूर ६६,
छत्रपती संभाजीनगर ६४, हिंगोली ३४, परभणी ४३, जालना ५३, बीड ७८, लातूर ५०, धाराशिव ४०, नांदेड ८७,
ठाणे ४७, रायगड ११४, पालघर ७५, रत्नागिरी १२५ आणि सिंधुदुर्ग ६१
पुणे १५३, अहमदनगर १२३, सोलापूर ९९, कोल्हापूर ८५, सांगली ६७, सातारा १११,
अशी असेल परीक्षा
परीक्षेचे स्वरुप ऑनलाईन आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा होईल. परीक्षा २०० गुणांची असेल. त्यात दोन विभाग असतील. पहिल्या विभागात बुद्धिमत्ता चाचणी आणि अभियोग्यता हे घटक असतील. दुसऱ्या विभागात शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह हे असेल.
Maharashtra School Teacher Center Head