पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील शाळांना उद्यापासून (१५ फेब्रुवारी) सलग ५ दिवस सुटी राहणार आहे. कारण, राज्यभरातील शिक्षकांचे वार्षिक अधिवेशन हे कोकणात होत आहे. या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी विशेष रजा देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.
रत्नागिरी येथील चंपक मैदानावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन आणि शिक्षण परिषद होत आहे. हे अधिवेशन १७ फेब्रुवारी रोजी होत आहे. संघटनेचे राज्यात २ लाखापेक्षा जास्त सभासद आहेत. या अधिवेशनास राज्यभरातून शिक्षक येणार आहेत. त्यामुळे १५ ते १७ फेब्रुवारी या काळात शिक्षकांना तीन दिवसांची विशेष रजा मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण विभागाकडे केली होती. त्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली आहे.
रत्नागिरीत होणाऱ्या या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
म्हणून ५ दिवस सुटी
अधिवेशन शुक्रवार, १७ फेब्रुवारीला आहे. मात्र, राज्यभरातून शिक्षक येणार आहेत. त्यामुळे त्यांना या अधिवेशनासाठी तयारी करता यावी आणि प्रवास करुन पोहता यावे यासाठी १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी असे तीन दिवस विशेष रजा देण्यात आली आहे. तर, शनिवारी, १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे. त्याची शाळांना सुटीच आहे. तर, दुसऱ्या दिवशी १९ फेब्रुवारीला रविवार आहे. अशा प्रकारे अधिवेशनाचे ३ दिवस आणि शनिवार व रविवारची सुटी असे एकूण ५ दिवस शाळांना सुटी असणार आहे.
Maharashtra School Closed 5 Days from Tomorrow