नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विकासासाठी प्रयत्न करणार्या 113 वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा जलालपूर, ता.जि.नाशिक या नवीन शाखेचा शुभारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (महाशिवरात्री) रोजी सकाळी 11.00 वाजता जयलिला बाग, जलालपूर, ता.जि. नाशिक येथे उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असून विशेष उपस्थिती महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे सदस्य प्रकाश होळकर, अॅड. नितीन ठाकरे यांची असणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा जलालपूर, ता.जि. नाशिक नुकतीच परवानगी मिळाली आहे. मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी मराठी भाषा व साहित्यासाठी उत्तेजन देणे, वाचकांची अभिरूची वृद्धिगत करणे तसेच साहित्यिकांच्या हितासाठी व कल्याणासाठी झटणे, मराठी भाषेच्या अभ्यासाला, प्रसाराला प्रोत्साहन देण्याबरोबरच अन्य भाषांच्या साहित्य चळवळीशी आवश्यकतेनुसार सहकार्य करणे. समाजाच्या सर्व स्तरात मराठी साहित्य विषयक आवड, अभिरूची, आस्था व जागृती निर्माण करणे व त्याची वृद्धी करणे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उद्देश आहेत. त्याच कृतीशील कार्याचा वसा आणि वारसा घेऊन जलालपूर शाखेची सुरूवात करण्यात येत आहे.
नाशिक शहराचा चहुअंगाने विकास होत असून पुणे, मुंबई नंतर साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात नाशिकने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गुणवत्तापूर्ण साहित्य निर्मिती करून लेखक, कवींनी आपली मोहर उमटवली आहे. हे अनेक नव्या-जुन्या पिढीतील साहित्यिकांनी नवी वाट निर्माण केली आहे. ते इथल्या सांस्कृतिक, साहित्य चळवळीला बळ देणारे आहे. नाशिकमध्ये सातत्याने सुरू असलेल्या साहित्य विषयक उपक्रमांतून अभिरूचीसंपन्न वाचक घडत आहे हे महत्वाचे ठरावे.
जलालपूर शाखा आपल्या सर्वांचे हक्काचे व्यासपीठ होईल. साहित्य विषयक चर्चा विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र येऊन सर्वांनी त्यात सहभागी व्हावे. नव्या उर्मीने लिहिणार्या लेखक, कवींच्या लेखनाला प्रेरणा देऊया आणि साहित्याचा जागर करूया. तरी उद्घाटन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जलालपूर शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ. शंकर बोर्हाडे, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, डॉ. स्मिता मालपुरे, मुख्य कार्यवाह विनायक रानडे, कोषाध्यक्ष राजू देसले, सदस्य रमेश पडवळ, विशाल उगले, प्रा. दर्शना देसाई, आर्कि. विजय पवार, प्रसाद पाटील, विशेष निमंत्रित प्रा.डॉ. विद्या सुर्वे-बोरसे, प्रा.डॉ. दिलीप पवार, डॉ. स्वाती भडकमकर, ऋता पंडित, विजयालक्ष्मी मणेरीकर, डॉ. सुनिता संकलेचा, संगीता चव्हाण, रेवती चिकेरुर आदींनी केलेले आहे.
Maharashtra Sahitya Parishad Nashik Branch Opening