नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला माझा विरोध नाही. परंतु या ठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे ती झाकून सावरकर यांचा पुतळा लावला गेला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहे त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. ही घटना मनाला दुःख देणारी आहे अशा भावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
नाशिक येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनात मोठ्या हॉलची व्यवस्था असतांना कार्यक्रम तिथे का घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे व हा मूर्खपणा कुणी केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पुतळे हटविण्याचे काम का केले जाणीवपूर्वक हे केले का हे शोधले पाहिजे व त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. ही जयंती साजरी करत असताना महाराष्ट्रात सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले. याबाबत निषेध व्यक्त करत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनात झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी शेणगोळे सहन करून मोठा त्याग केला व ज्या अहिल्यादेवींनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांचेच पुतळे या सरकारला सहन होईना. या लोकांच्या बुद्धीची कीव येते अशी टीका त्यांनी केली. तसेच आमचा सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही, पण महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय असे सांगत याबाबत निषेध व्यक्त केला आहे.
https://www.facebook.com/ChhaganCBhujbal/videos/1067412201279345/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB
Maharashtra Sadan Statue Removed Chhagan Bhujbal