मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसामुळे नादुरुस्त झालेले रस्ते तसेच पुलांच्या दुरुस्तीचे कामे तत्परतेने करावीत. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे विहीत मुदतीत दर्जात्मक पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिल्या. पूरहानी तसेच खड्डे भरण्याबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव श्री. दशपुते, यांच्यासह कार्यकारी अभियंता, विभागीय अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.चव्हाण यांनी राज्यातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्ती कामांची तसेच पूरहानीनंतर खड्डे भरण्याबाबतच्या कामांचा विभागनिहाय आढावा घेऊन संबंधितांना सूचित केले की, पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावीत. खड्ड्यांची डागडुजी व्यवस्थितरित्या करावी, जेणेकरुन पुन्हा होणाऱ्या पावसाच्या पाण्यातही रस्ता व्यवस्थित राहील. नागरिकांना त्रास होणार नाही,याची खबरदारी घेऊन रस्त्यांच्या खड्डयांची दुरुस्ती करावी.
रस्ते देखभाल व दुरुस्ती कार्यक्रम, वार्षिक देखभाल दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामांसाठी गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या कंत्राटदारांचीच नियुक्ती करावी. कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी आवश्यक प्रमाणात साधनसामुग्री, मनुष्यबळाची उपलब्धता व आवश्यक बाबीची पूर्तता करत असल्याबाबत क्षेत्रीयस्तरावर याचे सनियंत्रण संबंधित अधिकाऱ्यांनी करावे. कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांचे संनियंत्रण कार्यवाही प्रभावीरित्या करावी, अशा सूचना यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या.
maharashtra road potholes pwd minister ravindra chavhan highway rain monsoon