मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली तलाठी भरती अखेर होणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, यावेळी तब्बल ४ हजार ६२५ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे नोकरीसाठी इच्छुक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे ३ ते ४ गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.
राज्यात तलाठी पदासाठी १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंब या काळात ही भरती केली जाणार आहे. एकूण ४ हजार ६२५ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ३६ जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. या भरतीमुळे तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
Maharashtra Revenue Talathi Bharti Recruitment