पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चालू खरीप हंगामातील पेरणीच्या अनुषंगाने राज्यात १६ लाख ८२ हजार २४५ क्विंटल म्हणजे ८७ टक्के बियाण्याचा पुरवठा झाला असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४.३ मिमी असून आत्तापर्यंत २२७.३ मिमी एवढा पाऊस झाला आहे. खरीप हंगामासाठी ४६.७ मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. चालू खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र १४२ हेक्टर आहे. आजअखेर ४७.१३ लाख हेक्टरवर ३३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत कापूस, सोयाबीन व तूर या पिकांच्या पेरण्या तसेच प्रामुख्याने भात रोपवाटिकेची कामे सुरु आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास या आठवड्यात पेरणीच्या कामाला वेग येईल.
राज्यात पुरेसे बियाणे उपलब्ध असून फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरेदीची पावती व टॅग जपून ठेवावेत. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.