पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दहा – बारा दिवसांपासून पावसाने राज्यभरात विश्रांती घेतली आहे. आता मात्र पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संपूर्ण राज्यभरात येत्या चार ते पाच दिवस कमी – अधिक प्रमाणात पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्राने येत्या काही दिवसाचा हवामान अंदाज दिला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला काहीशी हजेरी लावल्यानंतर दीर्घ विश्रांती घेतलेल्या मोसमी पावसाने राज्यात जुलैमध्ये सरासरी भरून काढली. जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये संततधार पाऊस सुरु होता. काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले. मात्र, जूनमध्ये खालावलेली धरणांतील पाणीसाठ्याची पातळी जुलैच्या पावसाने वाढू शकली.
पावसाच्या विश्रांतीमुळे मुंबई परिसरासह कोकण पट्ट्यात उकाड्यातही वाढ झाली असून नागरिक हैरान झाले आहेत. पश्चिम-मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढले आहे. मराठवाड्यातील कमाल तापमानही ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. विदर्भात ब्रह्मपुरी, वाशिम, वर्धा, अकोला आदी जिल्ह्यांतील दिवसाचे कमाल तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले आहे. त्यांमुळे या भागातही उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
बहुतांश भागात निरभ्र आकाशाची स्थिती असल्याने तापमानात वाढ नोंदिवली जात आहे. राज्यात पुढील दोन दिवसांच्या कालावधीत काही भागांत ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर त्यानंतर दोन ते तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. वाढत्या उकाड्यावर फुंकर मिळावी म्हणून जनसामान्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे.
राज्यातील काही ठिकाणी येत्या काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामध्ये मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, नागपूरसह विदर्भातील सर्व भागांत, तर मराठवाड्यात काही ठिकाणांचा समावेश आहे. दक्षिण कोकणात काही भागांत ६, ७ ऑगस्टला अतिवृष्टीचा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे. पुणे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांत दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ५ किंवा ६ ऑगस्टपासून घाट विभागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rainfall Prediction IMD Weather Climate Forecast