एल-निनो आणि येणारा पावसाळा
महाराष्ट्रातील शेतीवरील परिणाम
जून ते सप्टेंबर हंगामात मोसमी पावसाची स्थिति कशी असेल ह्या अगोदर, येणारा उन्हाळा कसा असेल म्हणून प्रथम उन्हाळ्यासंबंधी माहिती घेणेही आवश्यक आहे. एप्रिल-मे-जून तीन महिन्यासाठी उन्हाळ्यातील उष्णतेसंबंधीचे भाकीत हवामान खात्याने तर केलेलेच आहे. त्यानुसार येणाऱ्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, उन्हाळा निगडीत पावसाळी हंगाम कसे वळण घेतो ही माहिती त्यानंतर घेणे ऊचीत ठरेल असे वाटते.
उन्हाळ्यासंबंधी – संपूर्ण उन्हाळ्यातील कमाल तापमान (दिवसाची उष्णता) विचार करता कोकण, सह्याद्री घाटमाथा, व पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राच्या ८०% भुभागावर ह्यावर्षीचा (एप्रिल,मे,जून) ३ महिन्यातील उन्हाळा म्हणजे दुपारचे कमाल तापमान हे सरासरी तापमाना इतकेच असण्याची शक्यता सर्वधिक म्हणजे ५५% जाणवते. म्हणजेच महाराष्ट्राच्या ८०% ह्या भुभागावर ह्या वर्षी उन्हाळा आल्हाददायकच असण्याची शक्यता जाणवते. मात्र वर स्पष्टीत वगळलेला भाग म्हणजे कोकण(मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हे ) व सह्याद्रीचा घाटमाथा (पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर इगतपुरी मावळ मुळशी पोलादपूर महाबळेश्वर पाटण शाहूवाडी बावडा ते चांदगड पर्यन्त)तसेच पूर्व विदर्भातील (भंडारा गोंदिया गडचिरोली) जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची सर्वाधिक शक्यताही तितकीच म्हणजे ५५% जाणवते. म्हणजेच केवळ फक्त ह्या २०% महाराष्ट्रातील भुभागावर उन्हाळा कडक असण्याची शक्यता जाणवते.
संपूर्ण उन्हाळ्यातील किमान तापमान(पहाटेचा गारवा) बघता काहीसा कोकण व दक्षिणेकडील महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ६५ % भुभागावर ह्यावर्षीचा (एप्रिल,मे,जून) ३ महिन्यातील पहाटेचे किमान तापमान हे सरासरी तापमाना इतकेच असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५% जाणवते. म्हणजेच महाराष्ट्रातील ह्या ६५ % भुभागावर पहाटेचा गारवा जाणवेल, असे वाटते. मात्र वर स्पष्टीत वगळलेला भाग म्हणजे कोकण व दक्षिणेकडील महाराष्ट्रातील मुंबईसहित ठाणे रायगड रत्नागिरी पुणे नगर सातारा सांगली सोलापूर बीड उस्मानाबाद लातूर ह्या जिल्ह्यातील पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ४५% जाणवते. म्हणजेच महाराष्ट्रातील केवळ फक्त ह्या ३५% भुभागावर म्हणजेच वरील जिल्ह्यात पहाटेचा गारवा हा कमीच जाणवेल, असे दिसते.
एकंदरीत संपूर्ण उन्हाळ्यात मुंबई ठाणे रायगड खान्देश नाशिक नगर व विदर्भातील जिल्ह्यात १-२ दिवस आली तर उष्णता सदृश लाट येऊ शकते, अन्यथा नाही. एकंदरीत येणाऱ्या आल्हाददायक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर येणार २०२३ च्या पावसाळी हंगाम काय दर्शवतो, हे पाहणे गरजेचे आहे. भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या अंदाजानुसार येत्या जून ते सप्टेंबर ४ महिन्याच्या दिर्घ कालावधी सरासरी नुसार देशात सरासरी इतका म्हणजे ९६ % ± ५ पावसाची शक्यता वर्तवली आहे. म्हणजेच देशात ह्या वर्षी सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता जाणवते. देशात ९६ ते १०४% श्रेणीत पडणारा पाऊस हा सरासरी पाऊस मानला जातो.
नकारात्मक शक्यतेच्या अंकानुसार म्हणजे ९६ % ± ५ जरी विचार केला तरी ही शक्यता (९६-५) ९१% येते कि जी सरासरीपेक्षा कमी पावसाच्या श्रेणीत मोडते. तरी देखील देशात निम्न पातळीतील टंचाईसदृश श्रेणीत ही अवस्था मोडत नाही. म्हणजेच टंचाई अथवा दुष्काळ स्थितीची शक्यता जाणवणार नाही, असे वाटते.
प्रॉबॅबिलीटीच्या भाषेत पावसाचे भाकीत व्यक्त करतांना, देशात सरासरी पाऊस होण्यासाठी सर्वाधिक ‘भाकित संभाव्यता ‘ ही ३५ % तर सर्वाधिक ‘हवामान संभाव्यता’ ही ३३% आहे. ह्या पेक्षा कोणत्याही(अनुकूल अथवा प्रतिकूल) श्रेणीसाठी संभाव्यता अधिक नाही.
‘भाकीत शक्यता’ म्हणजे ह्या संपूर्ण २०२२-२३ वर्षात जागतिक पातळीवरून भाकीतासाठी आवश्यक असलेली सर्व गोळा केलेली निरीक्षणे व त्यावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता होय. तर ‘हवामान संभाव्यता’ म्हणजे भाकीतासाठी आतापर्यंत उपलब्ध असलेल्या डेट्यावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता होय.
ह्यावर्षीच्या पावसाळ्याच्या जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीत ‘एल -निनो’ विकसित होण्याच्या शक्यते बरोबरच भारतीय महासागरात धन ‘ भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ (पॉझिटीव्ह इंडियन ओशन डायपोल) विकसित होण्याची शक्यताही आहे. म्हणजेच ह्या अवस्था एकमेकांना शह-काटशह देऊन देशाला सरासरी इतका पाऊस देण्याची शक्यता जाणवत आहे. कारण एक पावसाला मारक तर दुसरा पावसाला तारक ठरतो आहे. कारण पॉझिटिव्ह आयओडी हा भारत देशाचा ‘ ला-निना ‘ समजला जातो.
भारतीय हवामान खाते धन आयोडी व व रशिया, नॉर्वे स्वीडन च्या उत्तरेकडील युरेशियात कमी टक्केवारीत झालेल्या बर्फबारीच्या आधारे भारताच्या २०२३ च्या जून ते सप्टेंबर मोसमी पावसास अनुकूल दोन घटकाच्या आधारे एल निनो वर्षात देशात सामान्य मोसमी पावसाचे भाकीत केले आहे. ह्यात अजुन एक घटक कि ज्याचे आगाऊ भाकीत करता येत नाही ते म्हणजे पावसाळ्यातील पडणाऱ्या क्वानटम पावसाचे वितरण जर योग्य म्हणजे पाऊस समप्रमाणात झाल्यास नक्कीच हा तिसरा घटकही सामान्य पावसासाठी मदत करू शकतो.
आता येथे आयोडीची संकल्पनाही व्यवस्थित समजून घेणे गरजेचे वाटते.
अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरील (साधारण २०० फुट खोलीपर्यंत) एका ठिकाणचे पाण्याचे तापमान त्याच्या निरीक्षण काळातील सरासरी तापमानापेक्षा(म्हणजे सरासरी व प्रत्यक्ष तापमान ह्या दोघातील काढलेल्या फरकानंतर) आलेला अधिक किंवा उणे म्हणजे धन किंवा ऋण अंक उदा. +४ किंवा +३ किंवा काहीही असू शकतो,असा तो अंक असतो . भारताचा पश्चिमेकडील अरबी समुद्र (कि जो १० डिग्री दक्षिण ते १० डिग्री उत्तर अक्षवृत्त व ५० डिग्री ते ७० डिग्री पूर्व रेखावृत्त पर्यन्तच्या चौकोणातील) अरबी समुद्रातील विविध ठिकाणी अश्या प्रकारच्या त्यावेळी तापमानाच्या विविध नोंदी घेऊन पुन्हा त्यांची अरबी समुद्रासाठी एक सरासरी किमत काढली जाते की जी धन किंवा ऋण असू शकते, ती काढली जाते.
अश्याच प्रकारे बंगालच्या उपसागरातील (म्हणजे भारताचा पूर्वेकडील १० डिग्री दक्षिण ते ० डिग्री विषुववृत्त अक्षवृत्त व ९० डिग्री ते १०८ डिग्री पूर्व रेखावृत्त पर्यन्तच्या चौकोनातील)समुद्राच्या पृष्ठभागातील पाण्याच्या तापमानाची वरीलप्रमाणे एक किमत काढली जाते.
थोडक्यात अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरातील अश्या दोन्ही महासागराच्या पृष्ठभागीय पाण्याच्या तापमानाच्या दोन उपलब्ध झालेल्या चिन्हांकित किमती व त्यांच्या सरासरी तापमानापासून सरकलेले विसंगत तापमाने व त्यांच्यातील फरकावरून कोणता महासागर सापेक्षेतेने थंड किंवा गरम आहे ते कळते. त्यावरून ‘आयओडी’ च्या धन, ऋण व तटस्थ अवस्था ठरतात.
आता जेंव्हा अरबी समुद्राचे पाणी बंगालच्या उपसागरातील पाण्यापेक्षा अधिक गरम असते त्यावेळेस ‘ भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ म्हणजेच ‘ इंडियन ओशन डायपोल ‘ किंवा शॉर्टमध्ये ज्याला आपण ‘आयओडी’ म्हणतो भारत देशात पाऊस पडण्यास अनुकूल काल असलेला ‘धन आयओडी’ समजावा. आता वरीलपेक्षा उलट स्थिति असेल तर भारत देशात पाऊस पडण्यास प्रतिकूल काल असलेला ‘ऋण आयओडी’ समजावा. आणि वरील दोघापेक्षा ना ‘धन, वा ना ‘ऋण’ म्हणजे दोन्ही महासागराचे तापमाने सारखेच असतील तर, तरी देखील भारत देशात पाऊस पडण्यास अनुकूल काल असलेला ‘तटस्थ’ आयओडी’ समजावा.
अलीकडील काही परदेशीं एजन्सीनुसार येणाऱ्या पावसाळ्यात एल निनोची शक्यता वाढून ८०% वाढली आहे. म्हणजेच एल निनोमुळे पावसाची शक्यता देशात सरासरी पेक्षा कमी असु शकते. तसेच परदेशी तज्ज्ञांच्या मते ६०% एल निनो वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. २००१ ते २०२० अश्या २० वर्षात ७ वेळा म्हणजे २००३, ०५, ०९, १०, १५, १६, १७ अश्या ७ वर्षात सरासरी पेक्षा कमी पाऊस होवून दुष्काळ स्थितीला सामोरे जावे लागले. आणि ह्या ७ उन्हाळ व खरीपात पेरलेल्या पिकांना झळ बसुन उत्पादन कमी झाले आहे.
२०२३ च्या पावसाळी हंगामात नेमका जुलै – ऑगस्ट महिन्यात विकसित होणार असल्यामुळे खरं तर ह्याचं महिन्यात पावसाचे दिवस अधिक असतात. जून व सप्टेंबर महिन्यात मोसमी पावसाचे आगमन व निर्गमन स्थिती असल्यामुळे पावसाचे कमी दिवस असतात. त्यातही आगमन अलीकडच्या वर्षात उशिरा होत असल्यामुळे दिवस अधिकच कमी होतात. म्हणजे हे चित्र चिंतेचेही असू शकते, असे वाटते.
एकंदरीत मोसमी पाऊस हा सैतानी उष्णतेच्या स्रोतवर अवलंबून आहे. म्हणजेच ज्या आयओडी चा आधार मान्सून सरासरी इतका होण्याची आशा वाटते तोही फार मजबूत घटक म्हणता येणार नाही. कारण मोसमी पावसाच्या हंगामाच्या उत्तर्धात बऱ्याच वेळा अवतारलेला दिसतो. तर आयओडी सामान्य मान्सूनच्या पार्श्वभूमीवर येणार असेल तर अंडे- कोंबडीच्या कथे प्रमाणे आधी काय? हे ही येथे विचार करायला लावते.
महाराष्ट्रासाठी काय स्थिती असेल
आता हे झालं देशातील जागतिक पातळीवरील निरीक्षणाच्या आधारे आयएमडी ने केलेले भाकीत पण महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात महाराष्ट्रातही येत्या जून ते सप्टेंबर ४ ‘टरसाइल’ प्रकारनुसार सरासरी पेक्षा जरी कमी पावसाची शक्यता दर्शवत आहे. उत्कृष्टपणे पावसाचे वितरण झाल्यास तो सरासरी इतकाच पाऊस होण्याच्या शक्यतेची स्थिती असु शकते, असे वाटते. म्हणजेच ह्याला जर तरचे कंगोरे आहेत. कारण महाराष्ट्राबरोबरच लगतच्या गुजराथ म. प्र. कर्नाटक तेलंगणा राज्यात येत्या जून ते सप्टेंबर ४ महिन्यात ‘टरसाइल’ प्रकारनुसार सरासरी इतका तर केरळ ता.नाडू सीमांध्र जम्मू काश्मीर व पूर्वोत्तर कडील अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची सर्वाधिक शक्यता ४५% जाणवते आहे.
महाराष्ट्रात पावसाळी हंगामातील जून ते सप्टेंबर ४ महिन्यातील क्षेत्रफळभारित सररासरी पाऊस हा साधारण अंदाजे १०० सेमी. च्या आसपास समजावा. परंतु ह्यावर्षी ११ एप्रिलच्या हवामान विभागाच्या भाकितानुसार महाराष्ट्रात जर तो सरासरीपेक्षा कमी पडण्याचीच शक्यता अधिक आहे, असे वर्तवले आहे. सरासरीच्या ९० ते ९५% दरम्यानचा पडणारा पाऊस जर हा जर सरासरीपेक्षा कमी मानला जातो, तर महाराष्ट्रात २०२३ च्या मान्सून मध्ये ९० ते ९५ सेमी. इतका क्षेत्रफळभारित सररासरी पाऊस अपेक्षित आहे.
परंतु त्यातही मान्सूनचे उशिरा आगमन व आगमनानंतर कमकुवत मान्सूनचा रेटाप्रवाह आणि पावसाचे असमतोल वितरण अश्या तीन गोष्टींच्या शक्यता तपासल्यास महाराष्ट्रात क्षेत्रफळभारित सरासरी पाऊस हा ९० सेमी पेक्षा कमी पावसाची शक्यता दृष्टीपथात चमकते. कारण सरासरीपेक्षा ९० % पेक्षा पाऊस हा पावसाच्या ‘ टंचाई ‘ प्रकारात मोडला जातो. अशा अवस्थेत महाराष्ट्रात शेतीसाठी दुष्काळसदृश्य परिस्थितीची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणजेच ह्या शक्यतेचा विचार केल्यास शेतीसाठी टंचाईग्रस्त दुष्काळ स्थितीच समजावी. येथे वरील तीन घडामोडी आधारितच जर, तर बदल- ही चर्चा आहे.
शेतकऱ्यांनी शेतीत गुंतवणुकीचे नियोजन करतांना सावधगिरी बाळगावी. हातचे राखून ह्यावर्षी शेतीत पाऊल टाकावे. म्हणून खरीपात ऊस, केळी मका, भुईमूग, लाल कांदा( खरीप लागवड), कपाशी, हळद, आले, नवीन ऊस लागवड, विशेष पाण्याचे आर्द्रतापूरक भाजीपाला पिके घेण्याचे टाळावे. त्या ऐवजी तुषारसिंचनाचा आधार असल्यास सोयाबीन, कड धान्ये, बाजरी, बटाट्यासारखी व कमी कालावधीच्या भाजीपाला पिकांना प्राधान्य देऊन प्रतिकूल परिस्थितीत सिताफिने हंगाम जिंकावा तर रब्बीचे नियोजन पुढील स्थितीजन्य परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे वाटते.
तीन नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेत जरी बदलल्या तरी विशेष फरक पडणार नाही. तरी देखील पाऊस हा फार तर देशात पडणार तसा महाराष्ट्रतही सरासरीइतका पाऊस पडू शकतो म्हणजे फार सुकाळ स्थिती समजू नये. एकंदरीत एल निनो चा धसका जरी नाही तरी गांभीर्याने विचार होवून भारतीय खरीप हंगामात कदाचित मान्सून वेळेवर जरी आला तर खरीपात कमी वयाची व कमी पाण्यावरची मान्सूनचे आगमन कसे होते हे पाहून ह्या नुसार पिके घ्यावीत. पाण्याचे जलस्रोत आपत्तीस्थितीसाठी राखीव व्हावेत, असे वाटते. पाण्याचा वापर काटकसरीने होण्यासाठी जागरूकता व प्रबोधन होणे गरजेचे वाटते.
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Maharashtra Rainfall Monsoon Farming Agriculture by Manikrao Khule