मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदाच्या वर्षी पाऊस लवकर येईल असे म्हणणारे हवामान खाते तोंडघशी पडले आहे. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस मागच्या काही दिवसांपासून चिकमंगळूर, कारवार या कर्नाटक–गोवा या सीमाभागात रेंगाळलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लागून असलेला शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.
उकाड्यामुळे देशवासियांना हैराण केलं आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. पण, पाऊस येण्याचे नाव घेत नसल्याने राज्यात अद्यापही उष्णतेची लाट जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सूनचे लवकर आगमन होणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. तोही खोटा ठरला असून मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळण्यास अद्याप वेळ असल्याचे दिसत असून, १२ ते १३ जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्र राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उकाडा आणखीनच वाढला आहे. विदर्भातही उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याचा अंदाज
मान्सून ७ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता. पण पाऊल आला नसल्याने हा अंदाज फोल ठरला आहे. कारण गेल्या दिवसांपासून मान्सून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे. मान्सून राज्यात आता तो १२ ते १३ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे.
राज्यात उष्णतेची लाट
राज्यात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेचा सामना करावा लागत आहे. आता मान्सून पुढे गेल्याने आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गोंदियात सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढलेलाच आहे.