पुढील १० ते १२ दिवस जोरदार पावसाचे
जुलैच्या मध्यावर येऊन ठेपल्यानंतर आता पावसाकडे आणखीनच डोळे लागले आहेत. काही भागात पेरण्या झाल्या तर काही भागात पेरण्या होणे बाकी आहे. शिवाय जेथे पेरणी झाली आहे तेथेही पावसाची प्रतीक्षा आहे. आगामी १० ते १२ दिवसात पाऊस कसा असेल याची उत्सुकता सर्वांना आहे. त्याविषयी आता आपण जाणून घेऊया…

आजपासुन पुढील १२ दिवस म्हणजे गुरुवार दि.२७ जुलै पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकण व विदर्भातील (७+११)१८ जिल्ह्यात मात्र अति-जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते सोलापूर पर्यंतच्या १० तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर ते नांदेड पर्यंतच्या ८ अश्या १८ जिल्ह्यात पुढील १२ दिवस म्हणजे गुरुवार दि.२७ जुलै पर्यन्त मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.
त्यातही मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात मंगळवार दि.१८ ते गुरुवार दि.२० जुलै अश्या ३ दिवसात अधिक जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मात्र मुसळधार पडणारा पाऊस ६ दिवसानंतर म्हणजे शनिवार दि.२२ जुलै पासून काहीसा कमी होवुन तेथे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते.
महाराष्ट्रातील धरण-पाणीसाठा आजपावेतो केवळ सरासरी २५% पर्यन्त पोहोचलेला जाणवतो.
येत्या १५ दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील तसेच विदर्भातील सर्व धरण क्षेत्रात जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे धरण-पाणीसाठा सरासरी ७०% पर्यन्त पोहोचण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे वाटते.
मान्सूनचा आस सरासरी जागेपासून दक्षिणेकडे सरकण्याच्या शक्यतेबरोबरच (ii) बं.उ.सागरातील ‘चक्रीय-वारा अभिसरण’ प्रणालीतून उत्तर ओरिसा,बंगाल व झारखंड राज्याच्या भुभागावर आज दि.१६ जुलैला तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सहा किमी उंचीपर्यन्तचे चक्रीय वारे व त्यांचे वायव्य दिशेने मध्य भारताकडे होणाऱ्या मार्गक्रमण शक्यतेमुळे तसेच (iii) लगेच बं. उ. सागरात त्या पाठोपाठ त्याच ठिकाणी परवा मंगळवार दि.१८ जुलैला नवीन ‘चक्रीय-वारा अभिसरण’ प्रणालीची निर्मिती व तिचे पुन्हा वायव्य दिशेने मध्य भारताकडे होणाऱ्या मार्गक्रमण शक्यतेमुळे महाराष्ट्रात १०-१२ दिवस कमी-अधिक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
ह्या पावसावरच खरीपातील शेवटच्या टप्प्यातील पेरण्यास तसेच कमी ओलीवरील झालेल्या पेर पिकांना जीवदान व बारगळलेल्या पेरण्यांच्या दुबार पेरणीस मदत होईल असे वाटते.
वातावरणात विशेष काही बदल झाल्यासच मेसेज पाठवला जाईल. अन्यथा ह्या २ आठवड्यात मान्सूनचा परिणामाचे निरीक्षण बघावायचे आहे.
इतकेच!
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५