मान्सूनची सध्य:वस्था
जुलैच्या मध्यावधीत आल्यानंतरही राज्याच्या सर्वच भागात पावसाची मोठी प्रतिक्षा आहे. उत्तरेत धो धो कोसळणारा पाऊस महाराष्ट्रावर कृपावृष्टी केव्हा करणार असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. हवामानाचा नेमका अंदाज काय आहे हे आपण आता जाणून घेऊया…
आज(१४जुलै )पासून पावसाची तीव्रता अशी
मराठवाडा -१४,१५ व १७ ते २१ जुलै, मध्यम ते मुसळधार
विदर्भ – १४ ते १६जुलै मुसळधार तर १७ जुलै पासून जोरदार
मध्य महाराष्ट्र – १४,१५ जुलै केवळ मध्यमच तर १६ ते १९ जुलै मुसळधार
मुंबईसह कोकण – जोरदार सुरु असलेला पाऊस कायम
(i)अरबी समुद्रातील मावळलेला ‘ ऑफ-शोर-ट्रफ ‘ ची कालपासून पुन्हा गुजरात ते केरळ कि. पट्टी दरम्यान झालेली पुर्नरस्थापना व (ii) नेहमीपेक्षा दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा पूर्व-पश्चिम मुख्य आस आणि (iii) ह्या मुख्य आसातून दक्षिण उत्तरप्रदेशातील फतेहपूर शहरापासून पासून गुजरात राज्यपर्यन्त २ किमी. पासून ते ३ किमी. उंचीपर्यन्तच्या एक किमी.हवा जाडीत पसरलेला त्या मान्सूनच्या आसा चा एक फाटा ह्यामुळे?
कोकणाबरोबरच खान्देश ते सोलापूर पर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात (विशेषतः घाटमाथा) सध्याची पावसाची ही शक्यता वाढली आहे.
बंगालच्या उपसागरात आंध्रतील नेल्लोर ओंगोल शहरालगत पूर्व कि.पट्टीसमोर खोल समुद्रातील पृष्ठभागा पासून वर उंच साडेचार किमी.नंतर ते साडेसात किमी. पर्यन्तच्या ३ किमी. हवा जाडीत घडून येणाऱ्या चक्रीय वाऱ्याच्या अभिसरणीय प्रणालीतून विदर्भातही पावसाची शक्यता वाढली आहे.
आजपासून ३ दिवसांनी म्हणजे रविवार दि.१६ जुलैला ओरिसा कि. पट्टीसमोर बं.उ.सागरात एक नवीन ‘चक्रीय-वारा अभिसरण’ प्रणाली निर्मिती अपेक्षित आहे.
त्या नंतरच्या ३ दिवसांनीम्हणजे बुधवार दि.१९ जुलै ला त्याच ठिकाणी ह्या प्रणालीचे रूपांतर कमी दाब क्षेत्रात तर शनिवार दि.२१ जुलै दरम्यान तेथेच तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होवून त्याचे वायव्य दिशेने मध्य भारताकडे मार्गक्रमण होवु शकते. ह्यामुळेच शनिवार २१ जुलै नंतरच्या (२१ ते २७जुलै) आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता असुन ह्याच पावसावर शेवटच्या टप्प्यातील खरीपाची पेरणीची भिस्त अवलंबून असु शकते असे वाटते.
‘एल- निनो’ अजुनही विकसित झालेला नाही. एन्सोच्या तटस्थ ( ना,’ एल-निनो ‘ वा ना ‘ ला-निना ‘ अवस्था) अवस्थेतून तो एक ऑगस्ट दरम्यान एल- निनोच्या अवस्थेत एन्ट्री करू शकतो. त्या नंतर त्यापुढील आठ महिने (म्हणजे मार्च २०२४अखेर)पर्यन्त कार्यरत असण्याचे भाकीत वर्तवले जात आहे.
‘मॅडन ज्युलीअन ऑसिलेशन ‘(एमजेओ) सध्या भारत महासागरीय विषवृत्तीय प्रक्षेत्रात बुधवार दि. १९ जुलैपर्यन्तची उपस्थिती भलेही एम्प्लिटुड एकपेक्षा कमी असला तरी सध्याच्या मान्सून काळात पावसाची गतिविधिता वाढवण्यास त्याचीही मदत होण्याची शक्यता जाणवते.
उत्तराखंड, हि. प्र. व दिल्ली तील चालु असलेली अतिवृष्टी ओसरते-ना-ओसरते तेच अजुन एक नवीन पश्चिमी झंजावात येण्याच्या तयारीत आहे.
अ. क्रं.२ ते ७ मधील माहिती ह. साक्षरतेसाठी समजावी, ही विनंती.
इतकेच!
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५