नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, बूथ रचना, संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यासाठी महाराष्ट्रात मी जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सभांना जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. महाविकास आघाडीची सभा नक्कीच मोठी होईल. सर्व विभागात आम्ही सभा घेणार आहोत या सभेला शरद पवार उपस्थित राहणार की नाही, हे आम्ही आज किंवा उद्या ठरवू. आगामी निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवाव्यात यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे, असे ते म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. आता न्यायालय निकाल देणार आहे. या सुनावणीत १६ आमदार अपात्र ठरले तर या सरकारला राहता येणार नाही. आणि दुसरा पर्याय राहत नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना आदेश दिले आहेत की मंत्रालयात भेटीसाठी येणाऱ्यांना वेळ द्यावी. याविषयी पाटील म्हणाले की, या सरकारचा सावळा गोंधळ आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. जनतेची कामे होत नाहीत. जनतेसा मंत्री भेटत नाहीत. मंत्री विधानसभेच्या सभागृहात देखील नसतात.. ते लोकांना काय भेटणार..? आणि आता जनतेला भेटण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ सरकारवर आली आहे, असा टोला त्यांनी हाणला.
https://twitter.com/NCPspeaks/status/1640744601266057217?s=20
अयोध्या दौऱ्यावर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व मंत्रिमंडळ अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याने पाटील यांनी टीका केली. जनता हीच राम समजून जनतेची सेवा केली पाहिजे. सर्व मंत्रिमंडळ जाणं, हे प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला न रूचणारे आहे. आम्हीही राम भक्त आहोत..
स्वतः एकटं जाऊन, काय पूजा करायची, ती करा. पण आता सत्ता आहे. सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही, हे कायम लक्षात ठेवायचं असतं, असेही पाटील म्हणाले.
https://twitter.com/satishchavan55/status/1641050654893576193?s=20
Maharashtra President Rule NCP Leader Jayant Patil