मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व राजकीय संकट आणि सत्तासंघर्ष घडल्यानंतरही त्याचा धुराळा काही शमलेला नाही. त्यामुळेच राज्यात अद्यापही राजकीय घडामोडी सातत्याने घडत आहेत. त्यातच आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमासाठी एकत्र येणार आहेत. राज्यातील सत्तांतर आणि अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर अशी प्रथमच वेळ येणार आहे की, हे तिन्ही नेते एकाच कार्यक्रमात असणार आहे. निमित्त आहे ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात बसविण्याचेय
या तैलचित्राचा अनावरण सोहळा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या येत्या जयंतीदिनी म्हणजेच सोमवार, दिनांक २३ जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. तशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
माहे ऑगस्ट, २०२२ पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे तैलचित्र बसविण्याबाबत निवेदन केले होते. त्यानुषंगाने याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल असे या सभागृहाला आश्वासित केले होते. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे समारंभपूर्वक झळकणार आहे. या संस्मरणीय सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांनी सर्व विधानसभा व विधान परिषद सदस्यांना केली आहे. या समारंभावेळी ठाकरे, शिंदे आणि फडणवीस एकत्र येण्याची दाट चिन्हे आहेत. यावेळी नक्की काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Politics Uddhav Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis