मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानपरिषदेच्या सदस्य असलेल्या आमदार मनीषा कायंदे या शिंदे गटात जाताच ठाकरे गोटाची चिंता वाढली आहे. कायंदे यांच्या जाण्याने विधानपरिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. पर्यायाने विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांच्याकडे राहणार की जाणार, ही चर्चा रंगू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालविले आहेत. अशात ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून मित्रपक्षांसोबत भांडण सुरू असतानाच आता दुसरीकडे ठाकरे गटाला विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते गमवावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. आधी विप्लव बजौरिया आणि मग मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत.
ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या नऊ झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्यादेखील नऊ आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादीने दावा केला तर त्यांचे पद जाऊ शकते. एकीकडे अजित पवार हे विधासभेचे विरोधी पक्षनेते आहेत, म्हणजेच हे पद राष्ट्रवादीकडे आहे, त्यात आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.
रंगणार रस्सीखेच
आजघडीला ठाकरे गटाकडे ९, राष्ट्रवादीकडे ९ आणि काँग्रेसकडे ८ जागा आहेत. विधानपरिषदेत पाच अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी किशोर दराडे यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला आहे तर सत्यजीत तांबे यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ दहा होते. दराडेंनी पाठिंबा बदलला तर मात्र गेम बदलू शकतो. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला त्यांनी पाठिंबा दिला तर दावा केला जाऊ शकतो. विरोधी पक्षनेते आणि उपसभापतीपद ठाकरेंकडेच असल्यामुळे केवळ राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेसकडूनही दावा होऊ शकतो. त्यामुळे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी रस्सीखेच रंगण्याची शक्यता आहे.