मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटातील खासदार, आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असून सत्तेत राहूनही आपले हाल होत आहेत, अशी कैफियत त्यांनी मांडली आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमधील फोडाफोडीचे संकेत आताच मिळायला लागले आहेत.
अजितदादांच्या संशयास्पद भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. आजही जागावाटपावरून होणारे वाद आणि अजित पवारांची भूमिका यामुळे आघाडीची वज्रमुठ काहीशी सैलच आहे. यात उद्धव गट पुन्हा एकदा शिवसेनेचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी धडपडत आहे. तर तिकडे भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटालाही आगीतून फुफाट्यात आल्यासारखे वाटत आहे. या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भाजपसोबत शिंदे गटातील लोक खूश नसल्याचा दावा केला आहे.
दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने ठिणग्या पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्तेत राहून कामे होत नाहीत, तुच्छतेची वागणूक मिळते, अशी शिंदे गटातील आमदार-खासदारांची तक्रार आहे. त्यामुळे शिंदे गटातून बाहेर पडण्याची त्यांनी तयारी केली आहे. तानाजी सावंत आणि गजानन किर्तीकरांनी तर जाहीरपणेच याबद्दल बोलून दाखवले आहे. पण हे फार छोटे उदाहरण आहे. येत्या काही दिवसांत मोठा स्फोट होणार हे निश्चित आहे, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
शंभूराजेंचा उद्धव यांना निरोप
शिंदे गटाचे आमदार व राज्याचे पणन मंत्री शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवून आपली कैफियत मांडली आहे. भाजपकडून आपली गळचेपी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे बरेच लोक आमच्या संपर्कात असून लवकरच ते सत्तेतून बाहेर पडतील, असा दावा राऊत यांनी केला आहे.
२२ आमदार शिंदे गट सोडतील
सध्या भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटातील २२ आमदार गट सोडून बाहेर पडली. तसेच १३ पैकी ९ खासदार देखील आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा विनायक राऊत यांनी केला आहे. यामध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काळात सिद्ध होणार आहेच.
Maharashtra Politics Shivsena Shinde Thackeray