मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात गतिमान हालचलींचा सिलसिला सुरूच आहे. त्यातच सत्ताधारी शिंदे गटामधील अस्वस्थता आणखीनच वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ८ मंत्री सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. शिवसेनेतून बंड करण्याचा हेतू साध्य होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यावरुनच शिंदे गटात फूट पडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच जवळपास २० आमदारांनी पुन्हा मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. आज हे सर्व जण मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी पक्षातील आमदार, खासदारांची बैठक घेतली. ही बैठक पक्षातील असंतोष शमविण्यासाठी आणि भविष्यातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी होती. या बैठकीत सर्व आमदार-खासदारांनी कमालीची नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी सत्तेत आल्याने आपले काय होईल, अशी चिंताही व्यक्त केली. त्यावर शिंदेंनी आपल्यालाही काहीही फरक पडणार नसल्याचे सांगितले. ‘भाजपसोबत आपली युती वैचारिक पातळीवर झालेली आहे आणि आता झालेली युती ही केवळ राजकीय तडजोड आहे’, असे स्पष्ट मत एकनाथ शिंदे यांनी अजितदादांच्या एन्ट्रीवर व्यक्त केले आहे. या युतीमुळे घराणेशाही संपुष्टात येईल, कारण आता ठाकरे व पवार या दोन कुटुंबांना बाजुला ठेवून राज्यात एकत्र आलेल्या लोकांचे सरकार आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या नेत्यांना केले. आपण चर्चांवर आणि इकडच्या तिकडच्या घडामोडींवर लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे. राज्यात आपली लोकप्रियता वाढत आहे. अशावेळी आपण पक्ष वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे, असेही ते या बैठकीत म्हणाले.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत आलेल्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ज्या राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणार नाही, असा निर्धार करणाऱ्या देवेंद्र फडणविसांनी राष्ट्रवादीच्याच दिग्गज नेत्यांना जवळ केले. पण हा सगळा राजकारणाचा भाग म्हणून बाजुला ठेवला तरीही शिंदे गटाचे पुढे काय होणार, हा प्रश्न मोठा आणि महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी शपथ घेतली ते सगळे दिग्गज नेते आहेत. त्या साऱ्यांकडे छोटी खाती जाणे शक्यच नाही. त्यांच्याकडे मोठीच खाती जाणार, अशात शिंदे गट आणि भाजपमधील जे आमदार मंत्रीपदाची आस लावून बसलेले आहेत, त्यांच्या वाट्याला कोणती खाती येतील, असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांच्या गटातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपासाठी दबाव आणण्याचा आग्रह सर्वांनी शिंदेंना केला. मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांपूर्वी आपल्या नेत्यांचे खातेवाटप व्हावे, यासाठी हे सगळे आग्रही होते. त्यासाठी फडणवीस यांच्यावर दबाव आणला जावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
अजितदादांना काय मिळणार?
अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले असले तरीही त्यांच्याकडे कोणती खाती जाणार, याची उत्सुकता आहे. स्वतः फडणवीस आपली खाती त्यांच्याकडे देणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील खाती काढून अजितदादांना देणार, हे वेळच सांगेल.
या जिल्ह्यांमध्ये मतभेद
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगड, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मतभेद आहेत. अश्यात आगामी निवडणुका एकत्र लढायच्या असतील तर उमेदवारीवरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोण एक पाऊल मागे घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
याला काय अर्थ?
राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेच्या लोकांची कामे करत नाहीत, त्यांच्या जिल्ह्यांना योग्य निधी देत नाहीत, असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली आणि भाजपसोबत हात मिळवला. आता एक वर्षानंतर पुन्हा त्याच लोकांसोबत काम करायचे म्हणजे स्वतःचीच गळचेपी करून घेण्यासारखे आहे, अशी भावना शिंदे गटातील आमदारांनी व्यक्त केली आहे.