मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा जोरात सुरू आहे. विस्तारामध्ये कुणाकुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अजब दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपाने मंत्रिमंडळात असलेल्या शिंदे गटातील पाच जणांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने नामदार गुलाबराव पाटील यांचादेखील समावेश आहे. खडसे यांच्या या दावान्याने राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.
एकीकडे मंत्रिमंडळात विस्तारात आपल्याला स्थान असणार, अशी स्वप्ने पाहण्यात आमदार मश्गुल असताना विद्यमान मंत्र्यांनाच हटविण्यात येणार असल्याच्या चर्चेने धास्ती निर्माण झाली आहे. कोण नवीन येणार याऐवजी कोण जाणार, याची चर्चा अधिक होत आहे.
मुख्य म्हणजे शिंदे गटाचे फायरब्रॅण्ड असलेले गुलाबराव पाटील यांनाच हटविण्यात येणार असल्याच्या खडसे यांच्या दाव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. ‘भाजपा आणि शिवसेनेतील मतभेद बऱ्याच ठिकाणी समोर येत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांना हटवले पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या हायकमांडने घेतल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आहेत. हे पाचही मंत्री निष्क्रिय आहेत, असे भाजपावाल्यांना वाटत आहे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांची काम मंत्री करत नाही. त्यामुळे त्यांच्यात मतभेद आहेत. जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. या कामात गैरव्यवहार झाला आहे. याचे अहवाल दिल्लीतील वरिष्ठांकडे गेलेले आहेत. त्यामुळे गुलाबराव पाटलांना हटवले पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या वरिष्ठांनी घेतली आहे,’ असे खडसे म्हणाले आहेत.
अमित शहांची घेतली भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ मे रोजी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.