मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्यावर्षी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे गटासाठी रविवारचा दिवस नेहमीसाठी लक्षात राहण्यासारखा आहे. कारण गेल्या वर्षभरापासून जे लोक मंत्रीपदाची आस लावून बसले होते, ते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शपथविधीसाठी पुढे बसले होते.
अजित पवार यांनी सत्तेत सामील होत एकनाथ शिंदे यांच्या पॉवरला धक्का दिला आहे, असे बोलले जात आहे. कारण शिंदे गटाकडे दहा आणि भाजपकडे दहा मंत्रीपदे आहेत. एकूण ४३ मंत्रीपदे राज्य सरकारमध्ये आहेत. त्यातील केवळ २० वाटली गेली आहेत. राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे ही संख्या २९ झाली आहे. उर्वरित १४ मंत्रीपदे शिंदे गटाच्या वाट्याला जाणे केवळ अशक्य आहे. कारण मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतिक्षा केवळ शिंदे गट करीत नसून भाजपचेही अनेक नेते मंत्रीपदाचे स्वप्न रंगवत आहेत. संजय शिरसाट, बच्चू कडू या दोन नेत्यांनी विस्तारावरून बरेचदा भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली. बच्चू कडूंनी तर थेट सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा देखील वापरली. मात्र, त्यानंतर बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद देऊन शांत केले. मात्र संजय शिरसाट, भरत गोगावले आणि संजय बांगर या नेत्यांनी मंत्रीपदाचे स्वप्न सोडलेले नव्हते.
तिघेही मंत्री असल्यासारखेच किंवा मंत्री होणारच आहोत या आवेशात वावरत होते. मात्र रविवारच्या शपथविधीनंतर त्यांचे काय हाल झाले असतील, याची कल्पना न केलेलीच बरी. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्णवेळ आपल्या नेत्यांपासून चेहरा लपवून होते. त्यांच्या बोलण्यात दिसत नसली तरीही चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वांत मोठे बंड करून त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली होती. आता भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेऊन आपल्याला बाजुला करण्याचे प्रयत्न तर सुरू केलेले नाहीत ना, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
जागावाटपाचे काय होणार?
आता तर मंत्रीपदाची अपेक्षा असलेल्या नेत्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे, पण गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले शिवसेना व राष्ट्रवादी आगामी निवडणुकांमध्ये कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता असेल. महाविकास आघाडीत जागावाटपावरून जे युद्ध सुरू होते तेच आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनपेक्षित युतीमध्ये सुरू होणार, असे बोलले जात आहे.