मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना आणि भाजपमधील धुसफूस काही दिवसांपूर्वी अत्यंत किरकोळ गोष्टींवरून होती. मात्र ज्यावेळी भाजपच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री सुपुत्रांच्याच मतदारसंघावर दावा ठोकला, त्यावेळी प्रकरण चिघळले. आता कल्याण–डोंबिवली मतदारसंघाच्या संदर्भात उठलेल्या वादावरून मुख्यमंत्री व त्यांच्या सुपुत्रांना फडणविसांच्या भेटीला जावेच लागले.
कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघ २०१४ पासून शिवसेनेकडे आहे. याठिकाणी श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी २०१४ मध्ये पहिलीच लोकसभा निवडणूक जिंकली. मोदी लाटेत ते निवडून आले असे म्हटले जाते. पण या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव मोठा आहे. आरएसएसने पहिल्या निवडणुकीत पूर्ण काम केले. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा विजय अधिक सोपा झाला. त्याचाच फायदा म्हणून २०१९ मध्ये श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा विजय प्राप्त करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
खऱ्या अर्थाने या मतदारसंघात भाजपचा प्रभाव खूप जास्त आहे. पण दोन्ही निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांच्याच विजयासाठी भाजपने प्रयत्न केले. अशात आता भाजपच या मतदारसंघावर दावा ठोकायला लागल्याने जोरदार वाद निर्माण झाला. श्रीकांत शिंदे यांनी यावर आक्षेप घेत आपण राजीनामा देणार असल्याचे घोषित केले. त्यांच्या भूमिकेमुळे युतीमध्ये दरी निर्माण झाली. मात्र, हा वाद विकोपाला जात आहे असे वाटत असताना एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत कल्याण-डोंबिवली मतदारसंघाविषयी चर्चा झाल्याचे कळते.
भाजप तोडी करणार
कल्याण-डोंबिवली मतदारसंघ सोडून शिवसेनेच्या हक्काचे इतर दोन जिल्हा मागून घेण्याची तयारी भाजप करीत आहे, असेही बोलले जाते. विशेषतः कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा भाजपला आपले वर्चस्व निर्माण करायचे आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हा मतदारसंघ हिसकावून घेण्याची तयारी भाजपने केली आहे.