ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये येत्या निवडणुकींच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत वाद उफाळून आला आहे. यात आता कल्याणच्या जागेवरील मतभेदाची भर पडली आहे. भाजपने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच कल्याणची उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला आहे.
भाजपने महाविजय २०२४ चा संकल्प केला आहे. शिंदे गटही निवडणुकांसाठी सज्ज होत आहे. पण, त्यांच्याकडे भाजपप्रमाणे प्रभावी आणि सर्वदूर संघटन नाही. अशात दोघांमध्येही जागा वाटपावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीचे तर नेतेमंडळी-आमदार-खासदारांना उमेदवारीचे वेध लागले आहेत.
राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या आघाड्यांमध्ये आपापसांत जागावाटप नेमकं कसं होणार? यासंदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या जागांसाठी काही ठिकाणी मित्रपक्षांमधलेच अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपा-शिंदे गटामध्येही असाच काहीसा प्रकार घडताना दिसत असून कल्याणमध्ये चक्क मुख्यमंत्र्यांच्याच मुलाच्या उमेदवारीवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट पुढील सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचे निश्चित झाले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची माहिती ट्वीट करून दिली. मात्र, आता मुख्यंत्र्यांचेच पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा उमेदवारीवर आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे या वादावर शिंदे-फडणवीस कशा प्रकारे उपाय शोधणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Maharashtra Politics Shinde Group BJP Kalyan