मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी आणि युतीमध्ये असलेल्या पक्षांची एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली आहे. आपल्या हक्काच्या जागा सांगण्यापासून तर दुसऱ्या पक्षाच्या जागांवर हक्क सांगण्यापर्यंत एकमेकांच्या विरोधात नेते मंडळी उभी ठाकली आहेत.
तीन पक्ष मिळून २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली आणि महाराष्ट्राला सरकार मिळाले. पण यातील दोनच पक्ष असे होते जे जुने साथीदार होते. त्यात शिवसेनेची एन्ट्री आश्चर्य व्यक्त करण्यासारखी होती. पण तरीही या आघाडीने तीन वर्षे सरकार चालविले. त्यानंतर राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार आले. एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत हात मिळवला आणि महाविकास आघाडीला भगदाड पडले. त्यामुळे राज्यात आणखी एक नवे कॉम्बिनेशन सर्वांना बघायला मिळत आहे.
मात्र महाविकास आघाडी असो वा भाजप-शिंदे गटाची युती असो, निवडणुका आल्या की एकमेकांवर कुरघोडी सुरू होतेच. आतापर्यंत भाजपच्या विरोधात एकत्र एल्गार पुकारलेल्या महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतसे खटके उडायला लागले आहेत. तिन्ही पक्ष आपणच लोकसभेत जास्त जागांवर लढण्यासाठी कसे सक्षम आहोत, हे सांगत आहेत. भाजप-शिंदे गटातही काही वेगळे चित्र नाही.
भाजपचे रणजित सिंह पाटील यांनी धाराशीव लोकसभा मतदारसंघावर दावा करणारे विधान केल्यामुळे शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांना उत्तर द्यावेच लागले. आता धाराशीववरून दोघांमध्ये जुंपलेली आहे. विशेष म्हणजे ही जागा गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने जिंकली होती. त्यामुळे शिवसेनेचाच पहिला दावा आहे, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.
दावे-प्रतिदावे
२०२४ मध्ये धाराशीवमध्ये भाजपचाच खासदार व्हावा, यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे विधान भाजपचे आमदार रणजितसिंह पाटील यांनी केले होते. त्यानंतर शिंदे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या १८ पैकी एकही जागा शिवसेना सोडणार नाही, असे स्पष्ट करून पाटलांकडून चुकीने तसे वक्तव्य झाले असावे, असा टोलाही लगावला.
Maharashtra Politics Shinde Group BJP dispute