मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील कोल्ड वॉर थांबत नसताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यात उडी घेतली आहे. बीड येथे झालेल्या सभेतील भुजबळांचे भाषण तसेही वादग्रस्त ठरले होते. पण या सभेत छगन भुजबळ यांनी केलेल्या प्रश्नांना आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पैशांची अफरातफर, बेहिशेबी मालमत्ता याप्रकरणी छगन भुजबळ यांना भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अटक झाली होती. बराच काळ कारागृहात राहिल्यानंतर ते जामीनावर बाहेर आले. त्यानंतर शरद पवारांचे आभार मानले. पुढे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. नंतर शिंदेंच्या बंडानंतर मंत्रीपद गेले होते, पण आता अजितदादांच्या बंडामुळे त्यांच्याकडे पुन्हा मंत्रीपद आले. आता ते शरद पवारांच्या विरोधात उघडपणे बोलायला लागले आहेत. अलीकडेच बीडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते.
तेलगी प्रकरणाचा संदर्भ देत, माझा काहीच दोष नव्हता तर मला राजीनामा का द्यायला लावला, असा सवाल त्यांनी केला होता. विशेष म्हणजे शरद पवारांनी आतापर्यंत थेट प्रत्युत्तर कोणत्याच आरोपांना दिले नव्हते. आता मात्र भुजबळांच्या सवालावर ते बोलले आहेत. अलीकडेच जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. राजीनामा द्यायला सांगितला नसता तर तुम्ही तेव्हाच तुरुंगात गेले असते, असे रोखठोक प्रत्युत्तर शरद पवार यांनी भुजबळांना दिले आहे.
तुम्ही लक्ष देऊ नका
शरद पवारांनी बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना देखील महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ‘कोणताही संभ्रम ठेवू नका. लढायला लागा. अजित पवार गट माझ्यावर टीका करत आहे. पण त्यांना कोण समजवणार. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका,’ असा सल्ला त्यांनी जिल्हाध्यक्षांना या बैठकीमध्ये दिला.
तुम्ही राजीनामा का दिला नाही?
साहेब तुमच्यावर देखील आरोप झाले होते. १९९२-९२ आणि १९९४ मध्ये तुमच्यावर आरोप झाले होते. तुमचा राजीनामा कुणी मागितला नाही आणि तुम्हीही तो दिला नाही. पण छगन भुजबळचा राजीनाम तुम्ही का घेतला?’, असा सवाल छगन भुजबळांनी बीडच्या सभेत शरद पवारांना केला होता.
समीरला देशाबाहेर पाठवले
छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत पंकज भुजबळ यांच्याबाबतीत घडलेला एक प्रकारही सांगितला. ‘मी राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. एक दिवस पोलीस आयुक्त आले आणि म्हणाले की समीर भुजबळला अटक होणार आहे. ताबडतोब त्याला देशाच्या बाहेर काढा. आम्ही संध्याकाळी त्याला देशाच्या बाहेर पाठवलं. सीबीआयच्या चार्जशीटमध्ये माझं नावसुद्धा नाही. मग साहेब आमची काय चूक होती ते सांगा?’, असा देखील सवाल त्यांनी पवारांना विचारला होता.
Sharad Pawar’s reply to Bhujbal NCP Statement
Maharashtra Politics Sharad Pawar on Chhagan Bhujbal Telgi Scam