मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. खासकरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवार यांच्या घोषणेचे विविध अर्थ काढले जात आहेत. खासकरुन सोशल मिडियात विविध प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
सोशल मिडियावरील काही पोस्टमध्ये म्हटले आहे की, पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपसोबत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे भाजपसोबत जाणार आहेत. मात्र, त्यांच्या या निर्णयाला शरद पवार यांची सहमती नाही. त्यातच आता पवार यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घोषित केल्याने राजकीय चर्चांचा बाजार गरम झाला आहे. सोशल मिडियाच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपसोबत जाण्यासाठीच पवारांनी ही घोषणा केली आहे. लवकरच पवार हे राज्यपाल म्हणून दिसतील.
राज्याच्या राजकारणातील चाणक्य अशी शरद पवार यांची ओळख आहे. ते कधी काय निर्णय घेतात किंवा सूत्रे हलवतात हे कुणालाही काहीच कळत नाही. त्यांचे निर्णय हे धक्कादायक असतात असाच आजवरचा इतिहास आहे. त्यात आता त्यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा होत आहे.
Maharashtra Politics Sharad Pawar NCP BJP Social Viral