मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार व अजित पवार या काका पुतण्यांच्या गुप्त बैठकीमुळे राज्याचे राजकारण तापले आहे. पुणे येथे एका उद्योगपतीच्या घरी ही गुप्त बैठक झाली आहे. या बठकीबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगवेगळे दावे केले. तर, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही या बैठकीबाबत वेगळी माहिती दिली आहे. त्यामुळे बैठक एक पण चर्चा अनेक आणि दावेही अनेक असे चित्र आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं याविषयी सध्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, शरद पवार सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल असे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्टींकडून अजित पवारांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार भाजपाच्या सांगण्यावरुन शरद पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन प्रमुख पक्ष फोडूनही भाजपाची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित पवार हे शरद पवारां भेटत आहेत. लोकनेतृत्व असलेले शरद पवार यांची गरज भाजपाला आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही, असे वड्डेटीवार यांनी सांगितले आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या गुप्त बैठकीत म्हटले आहे की, अजित पवार यांच्या मार्फत शरद पवारांना ऑफर देण्यात आली आहे. शरद पवार यांना कृषीमंत्रीपद व नीती आयोगाचे उपाध्यक्षपद देण्याची तयारी भाजपने दाखविली आहे. शरद पवारांनी मात्र ही ऑफरला नकारली आहे. या संभ्रमाच्या राजकारणामुळे महाविकास आघाडीतही अस्वस्थता आहे.
ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी या बैठकीबाबत म्हटले आहे की, ही बैठक कौटुंबिक कारणासाठी होती. शरद पवार यांनी या बैठकीबाबत स्पष्टीकरण दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा कोणताही संभ्रम नसल्याचे सांगितले. पण, या गुप्त बैठकीत नेमकं घडलं काय हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
या गुप्त बैठकीबाबत नवीन चर्चा समोर आली आहे. शरद पवार हे भाजप सोबत येत नसतील तर त्यांनी निवृत्ती घेऊन तटस्थ रहावे, असा पर्याय अजित पवार गटाने दिला आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था शिवसेनेसारखी होऊ नये, तसे झाल्यास पक्षाचे दोन गट पडतील. परिणामी निवडणुकीत फटका बसेल. त्यामुळे पक्ष एकसंघ ठेवण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Politics Sharad Pawar NCP Ajit Pawar Secret Meet