बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संभ्रमाच्या राजकारणाचे चाणक्य म्हटले जातात. आताही त्यांनी एक गुगली टाकून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार हे आमचेच नेते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना जबरदस्त उधाण आले आहे.
पत्रकारांशी बोलतांना शरद पवार म्हणाले की, पक्षात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचे काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे. अजित पवार हे आमचेच नेते आहेत. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचे कारण नाही, असे शरद पवार यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर आता शरद पवारांनी त्यावर मत व्यक्त केले आहे.
या विधानानंतर अमरावतीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण घटकांसाठी अनेक योजना येणार आहेत. त्या संपूर्ण योजनांवर शरद पवार यांचे मनपरिवर्तन होईल. अजित पवार यांचे जसे झाले तसेच शरद पवार यांचेही होईल,
बाबनकुळे यांच्या प्रतिक्रियेनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार महाविकास आघाडीसोबतच आहेत. काँग्रेसनं शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काढावा, यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी याचा अर्थ काढावा, शरद पवार बोलत असतील तर याचा अर्थ आम्ही का काढावा? शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? हे सांगता येणार नाही. उद्या त्यांच्या पक्षाच्या फुटीचे प्रकरण निवडणूक आयोगात जाईल, कोर्टात जाईल. त्यामुळे तो त्यांच्या रणनितीचा भाग असू शकतो.
बघा, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या (व्हिडिओ)
Maharashtra Politics Sharad Pawar NCP Ajit Pawar Leader Statement