पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणी झाली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते देवेद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर आता पवार यांनी उत्तर दिले आहे. पवार यांनी आज येथे विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.
पवार म्हणाले की, महाराष्ट्रात दुसरी चिंतेची बाब ही की जातीय आणि धार्मिक विचार बांधून सांप्रदायिक विचारांचे वातावरण तयार करणे याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष आहे. विशेषतः जिथे त्यांची सत्ता नाही त्याठिकाणी जातीय वातावरण करणे, ज्या भागात दंगे होतात त्याची खोलात जाऊन चौकशी न करणे, या गोष्टी होत आहेत. राज्यात अलीकडे जातीय दंगली काही ठिकाणी झाल्या. जात आणि धर्माच्या नावाने रस्त्यावर येऊन एक दहशतीचे वातावरण तयार करणे, हे याठिकाणी घडणे, याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात कोणत्या स्थितीवर पोहचली आहे, हा अनुभव आपल्याला आला आहे.
पवार म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना मी महिलांसाठी आरक्षण दिले. राज्यातील हे धोरण राष्ट्रीय पातळीवरही राबवले याचे आम्ही स्वागत केले. आमचा आग्रह आहे की स्त्रियांना आरक्षण द्यायला हवे. आता हे आरक्षण केवळ महानगरपालिकेपर्यंत देऊ शकलो. विधिमंडळ आणि संसद याठिकाणीही स्त्रियांना आरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. मोदी साहेब यामध्ये पुढाकार घेत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या धोरणाला पाठिंबा देईल, याशिवाय अन्य राजकीय पक्षांशी बोलून त्यांनाही यात सहभागी कसे करून घेता येईल, याची आमची तयारी आहे.
पवार म्हणाले की, २०१४ च्या निवडणुका झाल्यानंतर भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा घेतलेली होती. २०१९ ला फडणवीस भेटले त्यात अनेक गोष्टींवर चर्चा झाली. त्यांनी सांगितले की पवार साहेबांनी धोरण बदलले. मी धोरण बदलले तर नंतर दोन दिवसांनी शपथ घेण्याचे कारण काय होते किंवा अशी चोरून पहाटे शपथ का घेतली? त्यांच्या शपथविधीनंतर दोन दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला. याचा स्पष्ट अर्थ आहे की सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, आम्ही किती अस्वस्थ आहोत, ही त्यांची अस्वस्थता महाराष्ट्रासमोर यावी, यादृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या. माझे सासरे सदू शिंदे हे देशातील उत्तम बॉलर होते. त्यांनी गुगलीने अनेक मोठमोठ्या लोकांच्या विकेट घेतल्या होत्या. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे गुगली कशी टाकायची आणि कुठे टाकायची हे माहिती होते. विकेट दिली तर ती घेतलीच पाहिजे. पण विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का?
पवार म्हणाले की, १९७८ साली सरकार स्थापन करताना आम्ही काँग्रेसची फसवणूक केली असे सांगतात. फडणवीस जे सांगतात की शिंदे आणि त्यांनी निवडणूक एकत्रित लढवली तशी परिस्थिती तेव्हा नव्हती. त्यावेळी स्व. इंदिरा गांधींचे काँग्रेस आणि स्वर्ण सिंह यांचे काँग्रेस असे आम्ही एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. आम्ही काँग्रेसविरोधात निवडणूक लढवली व त्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी काही गोष्टी त्याठिकाणी झाल्या. पण काँग्रेस (एस) हा स्वतंत्र पक्ष तसाच राहून आम्ही सरकार बनवले. त्यावेळी फडणवीस लहान असल्याने त्यांना हा कालखंड माहिती नसावा. मी त्यांना दोष देत नाही. हे त्यांचं अज्ञान होतं.
राज्यात दुबार पेरणीची वेळ आली तर राज्य सरकारने बी-बियाण्यांची सहजासहजी उपलब्धी करून ठेवावी आणि शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहावे. पण त्याला अजून दोन आठवडे आहेत, असे पवार यांनी सांगितले.