मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पक्षात मोठे बंड झाल्यास राज्यात आणखी एक भूकंप होऊ शकतो, याचा अंदाज घेत वादळ शमवण्यासाठी शरद पवार यांनी राजीनामा दिला असावा, असा अंदाज ठाकरे गटाच्या वतीने बांधण्यात आला आहे. ‘सामना’तील अग्रलेखाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शक्यतांवरही भाष्य करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षात बंडखोरी झाली. ४० आमदार इकडचे तिकडे गेले. पण पक्ष संघटन आणि पक्ष जागेवरच आहे. अश्याच प्रकारची बंडखोरी राष्ट्रवादीत झाली तर वाताहत होईल, असा विचार करत शरद पवार यांनी राजीनामा दिला असावा. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला.
‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे पक्षात निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय?, असा सवालही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत व त्यातील जास्तीत जास्त नावे पवारांच्या पक्षातील आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यात जास्त विलाप केला. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.
जनमानस तपासले
अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना रोखण्यासाठी शरद पवार यांनी हे पाऊल उचलले असावे का, असाही सवाल करण्यात आला आहे. उद्या राष्ट्रवादीचा एक गट भाजपमध्ये गेला तरीही जिल्हा स्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा प्रयोग असू शकतो, असा अंदाजही अग्रलेखातून बांधण्यात आला आहे.
त्यांचा एक पाय भाजपात
शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यावर अनेक नेत्यांनी अश्रू ढाळले आणि आकांतही केला. काहींनी तर तुमच्याशिवाय आम्ही कुणीच नाही, असेही म्हटले. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपमध्ये असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. पक्ष फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्त व्हावे, असा विचार पवारांच्या मनात आला असेल तर चुकीचे नाही, असे निरीक्षण अग्रलेखातून नोंदविण्यात आले आहे.
Maharashtra Politics Sharad Pawar Decision Thackeray Group