नाशिक – राजकारणात कुणी कुणाचे कट्टर शत्रू आणि कट्टर मित्र नसते असे म्हणतात. त्याचा प्रत्यय वारंवार येत असतो. आताही असेच चित्र दिसून आले आहे. नाशिकमधील आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाह प्रित्यर्थ तीन मान्यवर एकत्र जमले आणि राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली आहे. हे तिघे म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.
राज्यात मध्या महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश आहे. तर, गेल्या वेळी सत्तेत असलेले भाजप यंदा विरोधात आहे. त्यामुळेच भाजप नेते सत्ताधारी तिन्ही पक्षांवर जोरदार आसूड ओढतात. त्याचे नेतृत्व चंद्रकांत पाटील करतात. कधी वैयक्तिक तर कधी पक्षावर तर कधी सरकारवर दररोज टीकेची झोड असते. याच टीकेला सडेतोड प्रत्युत्तरही दिले जाते. मग, विषय कुठलाही असो.
त्यातच महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्येही मतभेद आहेत. नांदगाव विधानसभेचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात शड्डू ठोकला. त्यात सेना खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली. भुजबळांवर टीका केली. भुजबळांनी संयमाने हा विषय हाताळला आणि काहीही टीका केली नाही. याउलट समजूतदारपणा दाखवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या कोर्टात जो निकाल देईल तो मान्य करेल, असेही म्हटले. भुजबळांनी नांदगावकडे फिरकू नये, असेही राऊत म्हणाले.
आजच्या विवाह सोहळ्याला ही त्रिमूर्ती एकत्र जमली. केवळ राम रामच नाही तर एकाच सोफ्यावर ही मंडळी बसली. टीका, टीपण्णी, आरोप-प्रत्यारोप सारे बाजूला ठेवत तिघांची गप्पांची मैफल सजली. आणि हीच बाब सध्या सर्वत्र चर्चेची ठरत आहे.