मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा) – असे म्हणतात की गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एखादा विषय जातो तेव्हा त्याचा तातडीने निकाल लागतो. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली तरीही अद्याप राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा आणि खातेवाटपाचा पेच काही सुटलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ नेत्यांची सरकारमध्ये एन्ट्री झाल्यापासून मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. कारण नव्या मंत्र्यांचे खातेवाटप आणि जुन्यांचा मंत्रीमंडळात प्रवेश हे दोन्ही प्रश्न शिंदे-फडणवीस यांना सोडवायचे आहेत. महत्त्वाची खाती मिळण्याच्या अटीवर राष्ट्रवादीचे लोक सत्तेत आले. पण आता शिंदे गट त्यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. त्यामुळे ना त्यांना खाती मिळत आहेत ना यांना मंत्रीपद. या पार्श्वभूमीवर मुंबईहून अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि हसन मुश्रीफ असे तिघे दिल्लीत दाखल झाले. पण अमित शहांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलच गेले. मुश्रीफ व्यक्तिगत कामाने दिल्लीत गेल्याचे सांगण्यात आले. परत येताना अजित पवार आणि मुश्रीफ सोबत आले. पण या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल कुणीच काही बोलले नाही. सत्तेत सामील झाल्यानंतर एक औपचारिक भेट घेण्यासाठी आपण गेलेलो असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
५० मिनीटे बैठक
अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर तिघांमध्येही ५० मिनीटे चर्चा झाली. या चर्चेत नेमके कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले, याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पुन्हा खलबतं
अजित पवार दिल्लीहून दाखल झाल्यानंतर गुरुवारी दिवसभर पुन्हा शिंदे-फडणवीस यांच्यासोबत बैठकांचं सत्रं सुरू झालं. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत फारसे काही हाती लागले नाही म्हणून पेच सुटला नाही म्हणून, की राष्ट्रवादीला दिल्लीतून मिळालेला शब्द शिंदे गटाला मान्य नाही म्हणून पेच सुटलेला नाही, हे अद्याप कळू शकलेले नाही.
पंतप्रधान मोदींना भेटणार
अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल येत्या १८ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. भाजप व मित्र पक्षांची एक बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहेत.